शिवसेनेला विरोध करत २७ गावांमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघर्ष समितीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येथील २२ प्रभागांपैकी तब्बल १० जागांवर भाजपने उमेदवार रिंगणात उतरवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीत अस्वस्थतेचे वारे वाहू लागले आहेत. संघर्ष समितीने केवळ भाजपचा जयघोष करत ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर मनसेकडून जोरदार प्रतिकार केला जाईल, असा इशारा या पक्षातील नेत्यांकडून देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त असून यामुळे संघर्ष समितीत नवा संघर्ष उभा राहाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
डोंबिवलीलगत असलेली २७ गावे महापालिकेतून वगळावीत यासाठी सुरुवातीपासून आग्रही असलेल्या संघर्ष समितीच्या नेत्यांना भाजपने राजाश्रय दिल्याचे चित्र गेल्या काही महिन्यापासून निर्माण झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गावे वगळण्याचा निर्णय मध्यंतरी घेतला खरा, मात्र निवडणूक आयोगाच्या स्थगितीमुळे राज्य सरकारला चपराक बसली. त्यानंतरही या गावांमधून निवडणुका घेतल्या जाऊ नयेत यासाठी संघर्ष समितीचे नेते कमालीचे आग्रही होते. संघर्ष समितीच्या या भूमिकेला भाजप, मनसे, काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबाही दिला. शिवसेनेने मात्र येथून स्बळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने संघर्ष समितीच्या झेंडय़ाखाली सर्वपक्षीय एकवटल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना भाजपच्या चिन्हावर तब्बल १० उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने इतर पक्षांमधील अस्वस्थता वाढली असून संघर्ष समितीचे वरिष्ठ नेतेही सोमवारी उशिरापर्यंत याविषयी मौन बाळगून असल्याचे चित्र दिसत आहे.
२७ गावांमधील १७ प्रभागातून समितीचा पाठिंबा असलेले भाजपचे १०, मनसेचे दोन, संघर्ष समितीचे ५ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मनसे, भाजप, काँग्रेस आघाडीने संघर्ष समितीला पाठिंबा देऊन बहिष्कार यशस्वी करण्यासाठी आश्वासन दिले होते. दरम्यान, भाजपच्या चिन्हावर लढत असलेल्या १० उमेदवारांमुळे सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या झेंडय़ाखाली एकवटलेल्या इतर पक्षांमध्ये धुसफूस निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मनसेची खेळी
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बहिष्कार यशस्वी करायचा असेल तर तो पूर्ण यशस्वी करा, अन्यथा संघर्ष समितीचे नाव समेट समिती पडेल, असा सल्ला यापूर्वीच दिला होता. तोच प्रकार यावेळी झाला असल्याची टीका विविध स्तरातून होत आहे. संघर्ष समितीने केवळ भाजपचा जयघोष करीत निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला तर त्याला मनसेही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देईल, अशी प्रतिक्रिया मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली. मनसेने समितीच्या शब्दाप्रमाणे ग्रामीण भागात फक्त दोनच उमेदवार दिले आहेत. त्यामुळे संघर्ष समितीने कोणत्याही पक्षाची फार तळी उचलू नये, असे मनसेच्या एका नेत्याने सांगितले. यासंबंधी संघर्ष समितीच्या नेत्यांनी लवकरच अधिकृत भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले. मनसेचे नेते राजू पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.