कल्याण-डोंबिवलीत करोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. करोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींवर विद्युतदाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, शहरातील विद्युतदाहिन्या बंद ठेवण्यात येत असल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना अंत्यविधी उरकण्यासाठी स्मशानभूमीचा शोध घेत फिरावे लागत असल्याचे चित्र आहे.

करोना मृतदेहावरील प्लॅस्टिक आवरणामुळे विद्युतदाहिन्यांचे बर्नर जाम होऊन त्या बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमीमध्ये एकूण पाच विद्युतदाहिन्या आहेत. करोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींवर विद्युतदाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे शासनाचे आदेश आहेत.

एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेसाठी एक ते दीड तासांचा अवधी लागतो. तोपर्यंत इतर मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विद्युतदाहिन्या बंद ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. विद्युतदाहिन्या बंद ठेवल्यामुळे करोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील स्मशानभूमीमध्ये फिरून तिथे विद्युतदाहिनी सुरू आहे का, याचा शोध घ्यावा लागतो आहे. हा शोध घेईपर्यंत मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेतच असतो. रात्रीच्या वेळेत आणि पावसाळ्याच्या काळात स्मशानभूमीचा शोध घेत फिरावे लागत असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तसेच करोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह लाकडावर जाळण्यास परवानगी नसल्यामुळे नागरिकांना विद्युतदाहिनी सुरू होण्याची वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.

कल्याण पूर्वेतील एका उत्तर भारतीय समाजाच्या एका पदाधिकाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला. दाहिनी बंद असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आणि याबाबत कुणीही दखल घेण्यास तयार नव्हते. अखेर त्यांनी उल्हासनगर येथील स्मशानभूमीत मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार उरकले. डोंबिवलीत ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांच्या शवदहनाच्या वेळीही असाच प्रकार घडला.

पर्यायी उपाययोजनांची मागणी

सततच्या प्रक्रियेमुळे विद्युतदाहिनीत बिघाड होत असून त्याचबरोबर पहाटेपासून दहनाचे काम करणारा कामगार रात्रीपर्यंत काम करू शकत नाही. त्यामुळे या अडचणीत येत असल्याचे कळते. प्रदेश महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

प्लास्टिक वेष्टनातच करोना रुग्णाच्या मृतदेहावर दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येत असून यामुळे दाहिनीतील तांत्रिक यंत्रणेत बिघाड होत आहे. स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांची संख्या जास्त असल्याने दाहिनीमध्ये तात्काळ दुरुस्तीचे कामही हाती घेता येत नाही. त्यामुळे ही अडचण आहे. बिघाड कामगारांनी दूर करणेही जोखमीचे आहे. सद्य:परिस्थितीत याविषयी काय करता येईल याचा विचार प्रशासन पातळीवर करण्यात येत आहे.

– सपना कोळी, शहर अभियंता