17 January 2021

News Flash

टाळेबंदीमुळे बचावलेले बकरे पुन्हा कत्तलखान्याकडे

मुंबई, ठाण्यात आवक वाढली; मटणदरात १०० रुपयांची घसरण

संग्रहित छायाचित्र

आशीष धनगर

टाळेबंदीमुळे गेले तीन महिने बचावलेल्या बकऱ्यांची आता कत्तलखान्यांकडे रवानगी सुरू झाली आहे. राजस्थान, गुजरातसह राज्यांतील विविध भागांतील शेतकरी, व्यापारी हजारोंच्या संख्येने बकरे विक्रीसाठी मुंबई, ठाण्यात आणत आहेत. बकऱ्यांची आवक वाढल्याने तीन महिन्यांपूर्वी ७५० ते ८०० रुपये किलोपर्यंत पोहोचलेले मटणाचे दर आता ६०० ते ६५० रुपयांपर्यंत घसरले आहेत.

देवनार आणि कोन येथील बकरे बाजार तीन महिन्यांपासून बंद आहे. टाळेबंदीमुळे लाखो बकऱ्यांची विक्रीच होऊ शकलेली नाही. मात्र बकरे पोसणे अवघड झाल्याने राजस्थान, गुजरात या राज्यांसह राज्यातील शेतकरी आणि व्यापारी दररोज हजारोंच्या संख्येने बकरे घेऊन मुंबई, ठाण्याच्या वेशीवर येत  आहेत.  मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक महामार्ग तसेच पनवेल, कल्याण या मुंबईच्या वेशींवर बकरा विक्रीचे बाजार भरू लागले आहेत. टाळेबंदीमुळे उत्पन्नाचा स्रोत आटल्याने मिळेत ती किंमत पदरात पाडून बकऱ्याची विक्री करत हे शेतकरी स्वत:वरील ओझे कमी करताना दिसत आहेत.

काही महिन्यांपूर्वी कर्नाटक, तेलंगणा या राज्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये बकऱ्यांची आवक घटली होती. त्यामुळे विक्रेते डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान मुंबईत येत होते. त्या वेळी मुंबई, ठाण्यात  मटणाचे दर ७०० ते ८०० रुपयांच्या घरात पोहोचले होते. मात्र आता बकऱ्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात ८ हजार रुपयांना मिळणारा बकरा सध्या सहा ते साडेसहा हजार रुपयांना विकला जात आहे. मुंबई, ठाण्यातील बाजार बंद असल्याने या बकऱ्यांना ग्राहक मिळत नाही. कमी दराने बकरा विकावा लागतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तम प्रतीच्या बक ऱ्याच्या मटणाचे दर ६०० ते ६५० रुपयांपर्यंत घसरले आहेत, अशी माहिती ठाण्यातील बकरे व्यापारी आणि मटण विक्रेते प्रकाश कोथमीरे यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी देवनारचा कत्तलखाना सुरू झाला असला तरी बकरा बाजार मात्र अजूनही बंद आहे. देवनार येथील बकरे बाजारात एरवी दर आठवडय़ाला राज्याच्या विविध भागांतून तसेच गुजरात आणि राजस्थानच्या सीमा भागातून अंदाजे ६० ते ६५ हजार बक ऱ्यांची आवक होते. कल्याण येथील कोन परिसरात भरणाऱ्या बाजारात धुळे, मालेगाव, परभणी या भागांतून आठवडय़ाला ३५ ते ४० हजार बक ऱ्यांची विक्री होते.

मुंबई पालिकेच्या महसुलावर पाणी..

देवनार येथील बकरे बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक बकऱ्यामागे मुंबई पालिकेला ५० ते ६० रुपये कर परवान्यासाठी मिळतात. त्यामुळे प्रत्येक आठवडय़ाला पालिकेला अंदाजे ३५ ते ४० लाख रुपये कर मिळतो. टाळेबंदीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बकरे बाजार बंद आहेत. त्यामुळे पालिकेचा सुमारे ४ कोटींचा महसूल बुडाल्याची माहिती मुंबई पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 12:50 am

Web Title: goats rescued by lockout return to slaughterhouse abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 पारनेरमध्ये दिलजमाई, ठाण्यात हमरीतुमरी
2 घराजवळच करोना चाचणीची सुविधा
3 डोंबिवली क्रीडा संकुलात १८५ खाटांचे सुसज्ज करोना केंद्र
Just Now!
X