tvlog04वाढत्या नागरीकरणामुळे डोंबिवलीजवळील निळजे गावाचे गावपण हरविले आहे. एके काळी या गावात कौलारू घरे होती, शेती होती, गावाला ग्रामीण बाज होता.. मात्र आता सर्वत्र टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. गावातील ग्रामस्थांनी आपल्या जमिनी विकासकाला कवडीमोलाने विकल्या आणि हे गाव हळूहळू नागरीकरणाकडे झुकू लागले. आता हे गाव महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र त्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. गावातील  गृहप्रकल्पांकडून या गावाच्या ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा करमहसूल मिळतो. पण त्याप्रमाणात सोयी-सुविधा देण्यात ही ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे.

कौलारू घरे, घराला अंगण, सणासुदीच्या दिवशी अंगणात रांगोळ्या, पाऊस संपला की आवारात शेतातला भात ठेवण्यासाठी केलेला खळा. भात झोडणी, आणि मग कष्टाने पिकवलेले भात घरात लक्ष्मी म्हणून आणायचे, पावसाळ्याव्यतिरिक्त इतर काळात गावातील तलावाकाठी भाजीपाला लागवड करून वर्षभर दोन पैसे गाठीशी ठेवायचे, अशी एके काळी साधी ग्रामीण जीवनशैली असलेले डोंबिवलीजवळील निळजे गाव आता फक्त नावापुरतेच गाव उरले आहे. गावाच्या चोहोबाजूने भव्य गृहसंकुले उभी राहिली आहेत. या गगनचुंबी संकुलांनी गावातील कौलारू घरे दिसेनाशी झाली. विकासकांना शेतजमिनी विकून गावकऱ्यांनी शेतापेक्षा पैशाला महत्त्व दिले. गावातील नांगर, बैलगाडय़ा, टिकाव, फावडे ही शेतीची सामग्री आता नावापुरती उरली आहे. या अंगणातील सामग्रीच्या जागेवर आता जमिनी विकून आलेल्या पैशातील महागडय़ा चारचाकी गाडय़ा उभ्या आहेत. गावात पैसे नसताना जी माणुसकी होती, मनाची गर्भश्रीमंती होती, तिने गावातून काढता पाय घेतला आहे. गावकीचे गावपण बंगले, इमारती, पैशात हरवून गेले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळण्यात आलेली २७ गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बहिष्कृत गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट झाल्यास येथील विकासकामांना वेग येईल, असे बोलले जात आहे. डोंबिवलीपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर वसलेले, शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव ग्रामीण पट्टय़ातील महत्त्वाचा केंद्रिबदू होऊ पाहत आहे. मोक्याच्या जागी असल्याने निळजे गावाचे अतिशय झपाटय़ाने शहरीकरण झाले. लोढा हेवन, कासाबेलासारख्या मोठमोठय़ा वसाहती या गावाच्या परिसरात उभ्या राहिल्या आहेत. या गावाला स्वतंत्र रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे भविष्यात पनवेलला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल. गावाच्या एका बाजूला शहरीकरण होत असताना दुसरीकडे मात्र गावकऱ्यांमधील हेवेदावे वाढताना दिसत आहेत. गावाचे गावपण हरविले असून नातेसंबंधांमध्ये दुरावा येत चालला आहे. लोढा, कासाबेलासारख्या आलिशान वसाहती येथे निर्माण झाल्या खऱ्या, मात्र या उच्चभ्रू वस्तीला सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत आहे. भविष्यात या संकुलांना सोयीसुविधा देण्यास ग्रामपंचायतीने नकारात्मक भूमिका घेतली तर उद्भविणाऱ्या समस्यांना येथील नागरिकांनाच तोंड द्यावे लागणार आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले निळजे गाव म्हणजे आत्मिक सुखाचा एक झरा होता. ५०-६० वर्षांपासून गावकरी येथे गुण्यागोविंदाने राहत होते. हिरव्यागार वनराईत वसलेल्या या गावास सात तलावांची नैसर्गिक देणगी लाभली होती. या तलावांना भेट देण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटक गावांत येत असत. झाडाझुडपांनी वेढलेले गाव असल्याने येथे पक्ष्यांचीही वर्दळ असायची. निळजे तलावाच्या काठावर परदेशी पक्षी हंगामात वास्तव्यास येत असत. नैसर्गिक साधनसामग्री, भूभागाने संपन्न असलेल्या या भागावर नव्वदच्या दशकात विकासकांच्या नजरा गेल्या. विकासकांनी मोठय़ा रकमांचे आमिष दाखवून येथील शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या. पिढीजाद जमीन म्हणजे घरातील लक्ष्मी. पैशाच्या आमिषाने येथील शेतकऱ्याने ती कवडीमोलाने विकासकांच्या स्वाधीन केली. आता जमिनीचे भाव गगनाला पोहोचलेत. त्यामुळे हताश झालेला शेतकरी आता चिंताग्रस्त झाला आहे. मिळालेले पैसे घर, बंगल्यावर, लग्न कार्यावर खर्च झाले आहेत. गाव परिसरात पूर्वी शेती केली जायची. तीही आता नामशेष झाली. उलट जमिनींचा सौदा करणारे दलाल घरोघरी निर्माण झाले आहेत. या परिस्थितीमुळे अनेकांच्या कुटुंबीयांचे, त्यांच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय असल्याचे दिसून येत आहे. जमिनीचे भाव जसजसे वाढत गेले, तसतसे येथील नागरिकांच्या नातेसंबंधातील दरी वाढत गेली. जमिनीच्या पैशातून आलिशान बंगले, दोन-तीन मजली इमारती गावकऱ्यांनी उभारल्या. आलिशान घर तर बांधले, मात्र त्याला घरपण उरलेले नाही. एकीकडे आलिशान गृहसंकुल उभी राहत आहेत, तर दुसरीकडे गावातील गावकरी मात्र एकमेकांचे वैरी होऊन गावपणाला मूठमाती देत आहेत. ज्या काळात समृद्धी नव्हती, त्या वेळी गावात समाधान होते. आता घराघरात पैसा आलाय, पण पूर्वीचे समाधान राहिले नाही, असे ग्रामस्थ सुनील पाटील यांनी सांगितले.
या परिसरातील २७ गावे पुन्हा महापालिकेत समावेश करण्याचा अध्यादेश नुकताच राज्य सरकारने काढला. ही गावे पुन्हा पालिकेत समाविष्ट झाली तर निळजे गाव हे ग्रामीण भागातील एक महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरेल. या गावाची लोकसंख्या वीस ते पंचवीस हजारांच्या घरात आहे. वाढत्या नागरीकरणामुळे गावाचे रूपडे पालटले आहे. वाढत्या लोकसंख्येला ग्रामपंचायत पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. २००७ साली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताब्यात २७ गावांचा परिसर आला. यामुळे येथील गृहसंकुलांना चांगल्या नागरी सुविधा मिळतील, असे नागरिकांना वाटू लागले. मात्र ८ वर्षे उलटली तरी कोणत्याही नागरी सुविधा येथील नागरिकांना मिळाल्या नाहीत. २०१०मध्ये मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत एमएमआरडीएने व्हच्र्युअल क्लासरूमची संकल्पना आखली होती.
चांगल्या शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावा, वैद्यकीय मदतीचा ओघही त्या भागात पोहोचावा म्हणून व्हच्र्युअल क्लासरूम आणि रुग्णालय उभारण्याचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यातील १० गावांत राबविण्यात येणार होता. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. २०१३ मध्ये निळजे परिसराचे होत असलेले नागरीकरण लक्षात घेता येथे नगरपंचायत स्थापन करण्याबाबतचा एक प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाचाही विचार करण्यात आला नाही.
रोजचा प्रवास जिकिरीचा
कल्याण-शीळ मार्गालगत असलेल्या या गावात नागरिकांना प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळासह कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिका परिवहनच्या बसची सुविधा उपलब्ध आहे. डोंबिवली स्थानकापासून रिक्षाचीही सोय आहे, मात्र रिक्षाचालक एका व्यक्तीमागे २५ ते ३० रुपये भाडे आकारत आहेत. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. १९८१मध्ये उभारण्यात आलेले निळजे रेल्वे स्थानक गावापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानकात पॅसेंजरला थांबा आहे. मात्र नियमित प्रवाशांना त्याचा फारसा फायदा होत नाही. ठाणे, दिवा येथून पनवेलकडे जाण्यासाठी शटल, लोकल सेवा सुरू केली तर निळजे परिसर, डोंबिवली परिसरातील पनवेल, नवी मुंबईकडे जाणारा बहुतेक प्रवासी निळजे तसेच याच भागातील प्रस्तावित आगासन रेल्वे स्थानकातून पुढचा प्रवास करतील. यामुळे ठाणे, डोंबिवली रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांचा भार कमी होऊ शकेल.

thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
kolhapur ambabai temple marathi news, ambabai temple devotees kolhapur marathi news,
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरासमोर खरमाती, मलब्याचे ढीग; भाविकांची कसरत
Water supply by tanker to 61 villages in Jat and Atpadi talukas of the district sangli
सांगली: सव्वा लाख लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर
aap kandil morcha in kolhapur
कोल्हापुरातील २ हजार दिवे बंद; आपचा महापालिकेवर कंदील मोर्चा

अपुऱ्या आरोग्य सुविधा
निळजे गावात जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आहे. त्याचा लाभ केवळ गावकऱ्यांना होतो. लोढा हेवन व कासाबेला येथील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी डोंबिवलीतील रुग्णालयांचाच आसरा घ्यावा लागतो. निळजे ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा कर विविध गृहसंकुलांकडून मिळतो. त्या प्रमाणात ग्रामपंचायत त्यांना कोणतीही सोयी-सुविधा देत नाही. ग्रामपंचायतीमधील, गावातील राजकारणामुळे विशिष्ट भागात नागरी सुविधा देताना हात आखडता घेतला जातो, असा आरोप गावकरी करतात.

सात कोटींचे मुद्रांक शुल्क
शिवसेना शाखाप्रमुख आणि निळजेचे माजी सरपंच सतीश पाटील म्हणाले, शासनाकडून ६ ते ७ कोटींच्या घरात मुद्रांक शुल्क ग्रामपंचायतीला उपलब्ध होते. दरवर्षी त्याचे प्रमाण कमी-अधिक असते. गावात ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून तलावाच्या काठी ज्येष्ठ नागरिक भवनाची उभारणी २०१४ मध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी ५० ते ५५ लाखांचा निधी खर्च झाला. या भवनात ज्येष्ठांसाठी मनोरंजन हॉल, ध्यानकेंद्र, वाचनालयाची सुविधा आहे. २०१३ साली निळजे येथील तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले, त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च झाला आहे. तलावाच्या चोहोबाजूंनी जॉिगग ट्रॅक, वृक्षारोपण, विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशघाटाचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. तलावातील पाणी पिण्यायोग्य व्हावे यासाठी शुद्धीकरण केंद्र सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे.
 शर्मिला वाळुंज