फेरीवाल्यांचे पुन्हा बस्तान, वाहतुकीची बेशिस्तही कायम

ajit pawar
चावडी: अजितदादा आणि ईडी !
Hospital Ajit Pawar wakad
पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन! फुटपाथवर असलेल्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी नाही
mumbai gujarati language board marathi news
मुंबई: स्वा. सावरकर उद्यानात गुजराती भाषेतील नामफलक, संस्थेला महापालिकेची नोटीस
Mumbai is to be developed as a single whole city Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
मुंबई एकच, संपूर्ण शहराचा विकास करायचा आहे; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रेल्वे स्थानक परिसरात फेरीवालामुक्तीचा धडाका लावला असला तरी, जयस्वाल यांच्या या कारवाईचा प्रभाव केवळ त्यांच्या उपस्थितीपुरताच असल्याचे उघड होत आहे. जयस्वाल यांची पाठ फिरताच स्थानक परिसरात फेरीवाले आपले बस्तान मांडताना दिसू लागले असून रिक्षाचालकांची बेशिस्त आणि बेकायदा पार्किंग याबाबतही अशीच परिस्थिती आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेली फेरीवाल्यांची गर्दी, बेशिस्त रिक्षाचालकांचा रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांभोवती गराडा घालणे, सिगारेट विक्रेते याला प्रशासनाच्या कारवाईने काही प्रमाणात आळा बसला असल्याचे चित्र स्थानक परिसरात दिसत होते. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर वाहतुकीस अडथळा ठरणारी दुचाकी वाहने महापालिका प्रशासनातर्फे शुक्रवारी वाहतूक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. काही वाहनांची हवा काढण्यात आली, तर काही चालकांचा वाहन परवाना जप्त करण्यात आला. महापालिकेच्या कारवाईचा धडाका कायम असला तरी सोमवारी सॅटिस पुलाखाली दुचाकी उभ्या होत्या. स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिकेचे पथक स्थानक परिसरात गस्त घालत असले तरी मन मानेल त्या पद्धतीने उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकी वाहनांकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पोलीस चौकीबाहेरील फेरीवाल्यांचा गराडा सध्या काही प्रमाणात कमी झाला आहे. असे असले तरी मोकळ्या जागेत दुचाकी उभ्या केल्याने रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी नागरिकांना अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

दुसरीकडे, पालिकेच्या या मोहिमेचे मूळ कारण असलेले फेरीवालेही प्रशासनाला जुमानेसे झाले आहेत. जयस्वाल यांच्या कारवाईची पूर्वकल्पना मिळत असल्याने सायंकाळी ठरावीक वेळेत फेरीवाले या भागातून गायब असतात. आयुक्तांचा लवाजमा माघारी फिरतात फेरीवाले परततात, असे चित्र येथे आहे.

रिक्षा थांब्याचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर रविवारी पालिका प्रशासनाने कारवाई केली असली तरी स्थानक परिसरात रिक्षाचालकांची मनमानी अजूनही सुरूच आहे. रिक्षा थांब्यावर वाहने उभी करण्याऐवजी फलाट क्रमांक एकच्या बाहेर रिक्षा उभ्या करून स्थानकातून येणाऱ्या प्रवाशांना भाडे विचारण्याचा प्रकार कायम होता. स्थानकाबाहेर पडलेल्या प्रवाशांना भाडे विचारून रस्त्यावर बेकायदा उभ्या असलेल्या रिक्षापर्यंत घेऊन जाण्याचे काम रिक्षाचालक सोमवारी स्थानक परिसरात दिसले.