सप्टेंबर अखेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश

जयेश सामंत / नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : तिजोरीत असलेला खडखडाट आणि हजारो कोटी रुपयांचे दायित्व यामुळे यंदाच्या वर्षांत गगनभेदी प्रकल्पांचा मोह आवरता घेणारे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आधीपासून रेंगाळलेले प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यावर भर दिला आहे. ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याची नवी मुदत आखून देण्यात आली आहे. ठेकेदाराला निधीची चणचण भासू नये, यासाठी टप्प्याटप्प्याने निधीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कळवा खाडीपूल ऑक्टोबरमध्ये खुला होण्याची शक्यता आहे.

ठाणे आणि कळवा तसेच नवी मुंबई या शहरांना जोडण्यासाठी दोन खाडीपूल आहेत. त्यापैकी जुना झालेला ब्रिटिशकालीन खाडीपूल काही वर्षांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तर दुसऱ्या खाडी पुलावरून सद्य:स्थितीत वाहनांची वाहतूक सुरू आहे. वाहनसंख्येच्या तुलनेत हा पूल अपुरा पडू लागला असून यामुळे ठाणे आणि कळवा भागांत कोंडी होत आहे. ही कोंडी फुटावी तसेच भविष्यातील वाहतुकीचे नियोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेने येथे तिसरा खाडी पूल उभारण्यात येत आहे. मात्र गेली दोन वर्षे हा पूल या ना त्या कारणाने रखडत होता. डिसेंबर २०१९मध्ये या पुलाच्या कामास डिसेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, करोना टाळेबंदीमुळे पूल उभारणीची कामे रखडली. आता या पुलाची ८० टक्के कामे पूर्ण झाली असून केवळ २० टक्के कामे शिल्लक आहेत. त्यात खाडीवरील पुलाच्या खांबांवर गर्डर टाकणे, पुलाच्या मार्गिका रस्त्यावर उतरविणे, कारागृहाजवळील मार्गिका तसेच उद्यानातील वर्तुळाकार मार्गिका अशी कामांचा समावेश आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. या वृत्तास ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनीही दुजोरा दिला.

निधीची तरतूद

पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जुन्याच रखडलेल्या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये कळवा तिसरा खाडी पुलाच्या कामाचाही समावेश आहे. या पुलाच्या कामाचा एकूण खर्च १८७.३६ कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये यापूर्वीच ठेकेदाराला पालिकेने दिले आहेत. तर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ९ कोटी ९२ लाख, जानेवारीत ४ कोटी ३६ लाख आणि फेब्रुवारी महिन्यात ३ कोटी ८३ लाख रुपये ठेकेदाराला दिले आहेत. याशिवाय, ४ कोटी ५७ लाख रुपये मार्च महिन्यात देण्यात येणार असून उर्वरित ३९ कोटी ५२ लाखांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे, कळवा, विटावा, नवी मुंबई, मुंब्रा अशा विविध मार्गावर प्रवास करण्यासाठी कळवा खाडी पुलाचे महत्त्व मोठे असून या खाडीवर उभारण्यात येणारा तिसरा पूल लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत हा पूल खुला व्हावा, असा प्रयत्न आहे. त्यासाठी योग्य निधीचे नियोजन करण्यात आले आहे.

– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त ठाणे महापालिका