कल्याण-डोंबिवली महापालिकेत कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा चाप

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी कामावर वेळेवर हजर राहत नाहीत, अशा तक्रारी सातत्याने पुढे येत असतात. कर्मचाऱ्यांच्या या मस्तवाल वागणुकीला लगाम बसावा यासाठी महापालिका मुख्यालयात यापूर्वीही बायोमेट्रिक यंत्र बसविण्यात आले होते. परंतु या यंत्रणेत बिघाड झाल्याने काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांची हजेरी पुन्हा एकदा स्वाक्षऱ्यांद्वारे नोंदवली जात होती. महापालिका कर्मचाऱ्यांना वक्तशीर कारभाराची सवय लागावी यासाठी मुख्यालयात पुन्हा एकदा बायोमेट्रिक यंत्रणेची उभारणी करण्यात येत आहे. या यंत्रणेत मानवी हस्तक्षेपामुळे बिघाड निर्माण होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाळत त्यावर ठेवली जाणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सद्य:स्थितीत जुने खराब झालेले यंत्र काढून नवे बसविण्याचे काम सुरू आहे. कल्याण मुख्यालयात, सर्व हजेरी शेड आदी ठिकाणी एकूण १४६ बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात येणार आहे. एका यंत्राची क्षमता पंधरा हजारांपेक्षा अधिक हजेरी नोंदविण्याची आहे. कर्मचाऱ्यांची हजेरी लागावी यासाठी कार्यालयात येताना आणि कामाची वेळ संपल्यावर यंत्रावर पंच करणे आवश्यक आहे. सर्वाना शिस्त लागावी व त्यांनी वेळेत कामावर यावे यासाठी हे यंत्र बसविले जात आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. महापालिकेत यापूर्वीही अशा प्रकारची यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र काही मुजोर कामगारांनी या यंत्रांमध्ये बिघाड निर्माण केल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. पंच करण्याच्या ठिकाणी ब्लेडने ओरखडे ओढून त्यावर सिगारेटने चटके देऊन ते बिघडविण्यात आल्याचे प्रशासनाला संशय आहे. त्यामुळे यापुढे यंत्रात मानवी हस्तक्षेपाद्वारे बिघाड निर्माण होऊ नये यासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

हे यंत्र कार्यालयात लागल्याने काही कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एका अधिकाऱ्याने सांगितले अनेकदा आम्हाला मुख्यालयात बैठकीत जावे लागते. या यंत्रणेमुळे आम्हाला केवळ कामावर हजर आहोत हे दाखविण्यासाठी डोंबिवली कार्यालयात येऊन पंच करावे लागणार आहे. यापूर्वी अशा मशीन बसविण्यात आल्या होत्या, परंतु कोणत्याही मशीनवर हजेरी लावता येत होती. तसेच एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात बदली झाली वा इतर खात्यांत बदली झाली तर प्रत्येक वेळी मशीनमधील नावेही बदलावी लागलीत. त्यासाठी कंपनीच्या कार्यालयाला कळवून त्यात बदल करावे लागतील असे एकूण सर्वच त्रासदायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.