किशोर कोकणे

प्रत्यक्षदर्शीचा वनविभागाकडे दावा; ‘रेडिओ कॉलर’ नसल्याने प्रवास समजणे कठीण

ठाण्यातील कोरम मॉल आणि नजीकच्या हॉटेलमध्ये सहा तास तळ ठोकून असलेला बिबटय़ा गेल्या दोन दिवसांपासून नितीन कंपनी तसेच कॅडबरी जंक्शन परिसरात भटकंती करत होता, असा दावा काही प्रत्यक्षदर्शीनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केला आहे. हा बिबटय़ा नेमका कुठून व कसा आला, हे समजण्यासाठी आवश्यक असलेले ‘रेडिओ कॉलर’ तंत्रज्ञान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अद्याप कार्यान्वित झाले नसल्याने त्याची माहिती मिळेनाशी झाली आहे.

वर्तकनगर येथील सत्कार हॉटेलमध्ये सापडलेल्या बिबटय़ाला सहा तासांच्या थरार नाटय़ानंतर वन विभागाला जेरबंद करणे शक्य झाले. मात्र, या घटनेनंतर हा बिबटय़ा नेमका कोणत्या मार्गाने आणि कुठून आला हा प्रश्न सर्वानाच पडला असून वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या मार्गाचा शोध घेण्यात व्यस्त झाले आहेत. या बिबटय़ाला वन विभागाने पकडल्यानंतर त्याच्या शरीरात कोणतीही चीप वन विभागातील अधिकाऱ्यांना आढळून आली नाही. तसेच हा बिबटय़ा गेल्या पाच वर्षांत यापूर्वी कोणत्याही कॅमेऱ्यात आढळून आलेला नाही. त्यामुळे तो नेमका कोणत्या जंगलातून, कसा आला असावा याची कोणतीही माहिती समोर येत नाही. त्यामुळे आता या बिबटय़ाने नेमके किती अंतर पार केले आहे. तो नेमका कोणत्या भागातून आला आहे, याची माहिती मिळणे कठीण जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा बिबटय़ा नितीन कंपनी आणि कॅडबरी भागामध्ये भटकंती करत होता अशी माहितीही समोर येत आहे.

बिबटय़ाला बुधवारी जेरबंद केल्यानंतर त्याची व्यवस्थित देखभाल करण्यात येत आहे. त्याला कोणत्या जंगलात सोडण्यात येणार याची माहिती ठाणे वनविभाग घेईल असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.

रेडिओ कॉलर तंत्रज्ञान कागदावरच

रेडिओ कॉलर तंत्रज्ञानामध्ये वन्य जीवाच्या मानेला कॉरल प्रमाणे यंत्र बसविण्यात येते. त्याआधारे, वन्य जीव हा कुठे आहे. त्याने कुठ पर्यंत स्थलांतर केले याची माहिती या तंत्रज्ञानामुळे होते. संजय गांधी उद्यानातून ठाण्यातील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये बिबटय़ाचा शिरकाव वाढल्याने काही वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांच्या स्थलांतराची माहिती मिळविण्यासाठी रेडिओ कॉलरचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव अद्याप कागदावर असून ही यंत्रणा बसविण्यासाठी जुलै महिना उजाडणार आहे.  रेडिओ कॉलर तंत्रज्ञान जुलै महिन्यापर्यंत सुरू होऊ शकते. याद्वारे वन्यप्राण्यांच्या स्थलांतराची माहिती मिळू शकते असे एका अधिकाऱ्याने सांगितले.