कल्याण : टिटवाळ्याजवळील रुंदे वन विभागाच्या हद्दीत ठाण्याच्या पर्यावरण दक्षता मंडळाने दोन वर्षांपासून विकसित केलेली वनराई वणव्यात जळून खाक झाली. आगीत दोन वर्षांपासून लागवड केलेली विविध प्रकारची १५० हून अधिक झाडे होरपळली आहेत.

पर्यावरण दक्षता मंडळाने रुंदे गावाच्या हद्दीतील वन विभागाकडून २० हेक्टर जमीन वनराई विकसित करण्यासाठी घेतली आहे. गेली दोन वर्षे या जमिनीवर पर्यावरण दक्षता मंडळाकडून झाडांची लागवड आणि त्यांचे संगोपन करण्याचे काम सुरू आहे. दोन टप्प्यांत खैर, पिंपळ, आंबा, मोह, शिरीष, गुलमोहोर, ऐन, कांचन अशी सुमारे १५० झाडे या भागात लावण्यात आली आहेत. फेब्रुवारी ते जून कालावधीत या झाडांना सिंचन केले जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या चार महिन्यांत तग धरून ही झाडे पावसाळ्यात जोमाने फुलतात. पावसाळ्यात या झाडांच्या आजूबाजूचे गवत काढून आळे केले जाते. झाडांना किड वा मुंगी लागणार नाही याची काळजी घेऊन औषध फवारणी केली जाते.

वनराई पाहण्यासाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर येथे येऊन गेले आहेत. या ठिकाणी प्रशस्त वाचनालय सुरू करण्याची सूचना त्यांनी केली आहे, असे मंडळाच्या संगीता जोशी यांनी सांगितले.

लागवड केलेल्या झाडांबरोबर मूळ जंगली झाडांचे अस्तित्व कायम राहील याची काळजी घेतले जाते. येत्या पावसाळ्यात कोणत्या झाडांची लागवड करायची याचे नियोजन सुरू असतानाच वणव्याने झाडे जाळून टाकली आहेत. जळलेली झाडे जगविता येतील का या दृष्टीने काल पासून कामगार घेऊन झाडांच्या मुळाशी पाणी टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असे जोशी यांनी सांगितले.