मध्य रेल्वेवरचा प्रवास हा दिवसेंदिवस घातक होत चालला आहे. कळवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान तीन प्रवासी लोकलमधून पडले. यापैकी दोन प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेले प्रवासी मुंब्रा या ठिकाणी राहणारे आहेत. या दोघांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोकलमध्ये गर्दी उसळल्याने हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

तीन प्रवासी ट्रेनमधून पडल्याची घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली. कल्याणहून गर्दीने भरुन आलेल्या लोकलमध्ये कळवा स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी चढले. त्याच धक्काबुक्कीत तीन प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. यापैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

या आधी डिसेंबर महिन्यात डोंबिवलीच्या चार्मी पासड या २२ वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. गर्दीमुळे या तरुणीला लोकलच्या आत जाताच आलं नाही. ती बाहेर लटकली होती. डोंबिवलीतून लोकल जेव्हा कोपर स्थानकात आली तेव्हाच या चार्मीचा तोल गेला. ती खाली पडली, जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डोंबिवली येथील गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतही मांडला होता. ही घटना ताजी असतानाच आता कळवा स्थानकात आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत.