दररोज ३६ टन प्राणवायूची निर्मिती

किशोर कोकणे/ नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे :  ठाणे महापालिकेपाठोपाठ आता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि भिवंडी तालुक्यातील सावद रुग्णालयामध्येही प्राणवायू निर्मितीचे दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी निविदाही काढण्यात आल्या असून ही प्रक्रिया पूर्ण करून येत्या १५ ते २० दिवसात हे प्रकल्प उभे करण्याचा जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा मानस आहे. या दोन प्रकल्पांमधून दररोज ६.४ किलोलिटर प्राणवायू निर्माण होणार असून यामुळे जिल्ह्य़ाच्या शासकीय रुग्णालयांमधील प्राणवायूची चिंता मिटण्याची चिन्हे आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात दिवसाला सरासरी ५ हजार रुग्ण आढळून येत आहेत. तर दिवसाला सरासरी ४० ते ५० रुग्णांचा मृत्यू होत आहे. रुग्ण संख्या वाढल्याने जिल्ह्य़ात प्राणवायूचा तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने प्राणवायू निर्मितीचे तीन प्रकल्प उभारण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला असताना, त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनानेसुद्धा अशाच प्रकारचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून  जिल्हा रुग्णालयात तसेच सावद येथील करोना रुग्णालयात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे हवेतून प्राणवायूची निर्मिती केली जाणार आहे.

या दोन्ही प्रकल्पातून ६.४ किलोलिटर प्राणवायू निर्माण होणार आहे. एका प्रकल्पासाठी १ कोटी ९० लाख इतका खर्च येणार आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दररेज १६ मेट्रिक टन प्राणवायूची गरज भासते.

या रुग्णालयाला रायगड आणि नवी मुंबईतील रबाळे भागातून टँकरद्वारे प्राणवायूचा पुरवठा होतो. असे असले तरी, सद्य:स्थितीत राज्यात सर्वत्र प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला असून ही बाब लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालय प्रशासनाने प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे येत्या काही दिवसात जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच भिवंडीतील सावद रुग्णालयातील प्राणवायूची चिंता मिटणार आहे. तसेच भविष्यातही या प्रकल्पांचा फायदा रुग्णालयाला होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पार्किंग प्लाझा रुग्णालय दोन दिवसात सुरू 

ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा करोना रुग्णालये काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, प्राणवायूचा पुरवठा कमी असल्यामुळे तेथील रुग्णांना ग्लोबल रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हापासून पार्किंग प्लाझा रुग्णालय प्राणवायू पुरवठय़ाअभावी बंदावस्थेत आहे. याबाबत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्राणवायू निर्मिती करणाऱ्या लिंडा कंपनीकडे पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दररोज १५ टन प्राणवायू पुरवठा करण्याचे मान्य केले असून  प्राणवायूचा पहिला टँकर रुग्णालयात पाठविला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात हे रुग्णालय सुरू होणार आहे. येथे प्राणवायूच्या ४०० तर अतिदक्षता विभागातील २०८ खाटा उपलब्ध होणार आहेत.