वाहनांच्या वर्दळीमुळे ७५ डेसिबलपेक्षा जास्त ध्वनिप्रदूषण
सण, उत्सवांच्या काळात ढोल-ताशे, ध्वनिवर्धक यंत्रणा यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर सातत्याने ओरड होत असते. मात्र, ठाणे शहरातील नऊ प्रमुख नाके दिवसभर वाहनांच्या वर्दळीमुळे ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे समोर येत आहे. ठाणे महापालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या नाक्यांवर ध्वनीची पातळी ७५ डेसिबलपेक्षा जास्त असल्याचे उघड झाले आहे.
गेल्या काही वर्षांत ठाणे शहराच्या लोकसंख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. तसेच वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार ठाणे शहरातील वाहनांची संख्या २० लाखांवर पोहोचली आहे. वाहनांच्या संख्येच्या तुलनेत शहरातील रस्ते अपुरे पडू लागल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी अद्याप रुंदीकरणाची कामे न झाल्याने या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. प्रामुख्याने या भागांतच ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.
महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार, शहरातील नऊ नाके ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने जुलै महिन्यात शहरातील १७ प्रमुख नाक्यांवर ध्वनीचे मापन केले होते. त्यापैकी आठ नाक्यांवर ७५ डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीची तीव्रता असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये नितीन कंपनी, पोखरण रस्ता क्रमांक एक, उपवन, मुलुंड चेकनाका, बाळकुम नाका, गावदेवी नाका, कॅसल मिल नाका, कापुरबावडी आणि कळवा या नाक्यांचा समावेश आहे. वाढत्या नागरीकरणामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत असून चौकांमध्ये सरासरी ध्वनीची तीव्रता ६९ ते ८६ डेसिबल इतकी आहे. निवासी, व्यावसायिक क्षेत्रामध्ये ५८ ते ८२ डेसिबल इतकी आहे, असे पर्यावरण अहवालात म्हटले आहे.
वाहने वाढता वाढती..
ठाणे शहरामध्ये वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. २०१५-१६ मध्ये शहरात १० लाख ३ हजार ७९१ दुचाकी होत्या. त्यात २०१६-१७ मध्ये ७२ हजार ७७३ नव्या दुचाकींची भर पडून त्यांची संख्या १० लाख ७६ हजार ५६४ इतकी झाली आहे. दुचाकीमध्ये गतवर्षीपेक्षा ७ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये गतवर्षीपेक्षा ५.७८ टक्के म्हणजेच एक लाख ५ हजार ५३४ इतकी वाहने वाढली असून शहरात आता एकूण १९ लाख २७ हजार १५५ इतकी वाहने आहेत.