अग्निशमन विभागाचा परवाना, गुन्ह्यंची तपासणी न करता परवानगी; महापालिका छाननी करून निर्णय घेणार

ठाणे : शहरातील लसीकरण वेगाने व्हावे यासाठी जवळपास ८५ रुग्णालयांना लसीकरणासाठी वेगाने परवानगी देणाऱ्या महापालिका प्रशासनाने अवघ्या दोनच दिवसांत या परवानग्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ८५ रुग्णालयांना अशा परवानग्या देण्यात आल्या, त्यांपैकी काहींना अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखलाही प्राप्त झालेला नाही. तसेच काही रुग्णालयांवर इतर स्वरूपाचे गुन्हे दाखल आणि न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. या संदर्भात थेट भेटी आणि पुढील परीक्षण केल्यानंतरच परवानग्या दिल्या जातील, असे महापालिकेने या रुग्णालयांना कळविले आहे. दरम्यान, या रुग्णालयांना स्थगिती दिली नसून केवळ परवानग्यांची तपासणी करण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

करोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापकता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे या उद्देशातून महापालिकेने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना आणि गृहसंकुलांसाठी लसीकरण धोरण निश्चित केले आहे. या धोरणांतर्गत शहरातील ८५ खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरू करण्यासाठी पालिकेने दोन दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. तसेच या रुग्णालयांची यादीही जाहीर केली होती. या सर्व रुग्णालयांचे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यामध्ये लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, त्याचे व्यवस्थापन कसे असायला हवे, याबाबत माहिती दिल्याचा दावा पालिकेने केला होता. या रुग्णालयांना पालिकेमार्फत लशींचा साठा उपलब्ध करून दिला जाणार नसून या रुग्णालयांनी लस उत्पादकांकडून लशींचा साठा उपलब्ध करून घ्यावा, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यामुळे या सर्वच रुग्णालयांनी एकत्रित येऊन लससाठा मिळविण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता. असे असतानाच या सर्वच रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरू करण्यासाठी दिलेल्या परवानग्यांना स्थगिती देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापैकी काही रुग्णालयांना अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखलाही प्राप्त झालेला नाही. काही रुग्णालयांवर इतर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर काहींची न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. काही रुग्णालयांकडे लसीकरण केंद्रासाठी पुरेशी जागा नाही. यासंबंधीची चाचपणी करण्यापूर्वीच लसीकरण केंद्रे सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या सर्वच परवानग्यांना दोनच दिवसांत स्थगिती देण्याची नामुष्की ओढवली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ८५ खासगी रुग्णालयांना परवानग्या दिल्या आहेत. त्यापैकी काही रुग्णालयांकडे अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच इतर स्वरूपाच्याही काही तक्रारी आहेत. या पाश्र्वभूमीवर परवानग्या तपासण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. परंतु रुग्णालयांना देण्यात आलेल्या परवानग्यांना स्थगिती दिलेली नाही.

गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका