सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करण्याबाबत न्यायालयाने आखून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आंधळय़ा कारभाराचा नमुना समोर येत आहे. गणेशोत्सव सरून सहा महिने उलटल्यानंतरही पाचपाखाडी येथील धर्मवीर मार्गावरील मंडपाच्या उभारणीसाठी रस्त्यावर करण्यात आलेले खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. मंडपाच्या खांबांसाठी खोदलेले हे खड्डे बुजवले नसतानाही पालिका प्रशासनाकडून संबंधित मंडळावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

ठाणे महापालिकेपासून काही हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पाचपाखाडी परिसरातील धर्मवीर मार्गावर दरवर्षी नरवीर तानाजी गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यात येतो. हा गणेशोत्सवाचा मंडप पूर्णपणे रस्त्यावरच बांधला जात असल्यामुळे वाहनांची तसेच नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होते. गेल्या वर्षीदेखील ऑगस्ट महिन्यात नरवीर तानाजी गणेशोत्सव या मंडळातर्फे गणेशोत्सवासाठी धर्मवीर मार्गावर मंडप उभारण्यात आला होता. या मंडपासाठी बांधकामाच्या वेळेस आवश्यक असणाऱ्या बांबूंना साहाय्याने आधार मिळावा यासाठी रस्त्यावर काही विशिष्ट अंतरावर खड्डे करण्यात आले होते. परंतु गणेशोत्सव होऊन पाच महिने उलटून गेले तरी हे खड्डे उकरलेल्या अवस्थेतच पाहायला मिळत आहेत. हा रस्ता नितीन कंपनी सव्‍‌र्हिस रोडला जोडलेला आहे. त्यामुळे या या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. गणेशोत्सवाचे मंडप रस्त्यावरून काढल्यानंतर बांधकामासाठी खणण्यात आलेले रस्त्यावरील हे खड्डे बुजवून पूर्ववत करण्याची जबाबदारी असतानाही मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून येत आहे. लहान लहान आकाराचे एकूण २० खड्डे या रस्त्यावर आहेत. हे खड्डे विशिष्ट अंतरावर खणण्यात आलेले आहेत. त्यामुळे खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांचे या ठिकाणी अपघात होत असल्याचे येथील नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. खड्डय़ांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पालिकेने तातडीने कारवाई करावी असे स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

या खड्डय़ांवर शहर अभियंत्यांना पाहणी करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येईल.

संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका