News Flash

पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विक्रीचा पेच

वसई तालुक्यात विविध पिकांबरोबरच पांढऱ्या कांद्याचेही पीक घेतले जाते.

आठवडी बाजार खुले नसल्याने परिणाम 

वसई : दरवर्षी उन्हाळ्यात वसईच्या ग्रामीण भागातील पांढरा कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो. परंतु मागील काही दिवसांपासून करोनाचा कहर वाढू लागल्याने कांदा विक्रीसाठी उपलब्ध असणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. कांदा तयार होऊनही विक्रीसाठी बाजारात पोहचू शकत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्याने याचा मोठा फटका पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

वसई तालुक्यात विविध पिकांबरोबरच पांढऱ्या कांद्याचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यातील पूर्व व पश्चिम भागात अनेक ठिकाणी विविध पिकांची लागवड करण्यात येत असते. यामध्ये करंजोण, जांभूळपाडा, तिल्हेर, वजे्रश्वरी, उसगाव, निर्मळ, भुईगाव,गास, कळंब, राजोडी, नवापूर, नंदाखाल अशा भागात विविध प्रकारच्या फळभाज्यांची, त्यामध्ये पांढऱ्या कांद्याच्या पिकाचीही लागवड केली जाते. हा पांढरा कांदा आरोग्यासाठी व शरीराची दाहकता कमी करण्यासाठी गुणकारी असल्याने या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामात कांद्याचे उत्पादन तयार करून अनेक शेतकरी हा कांदा बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. विशेषत: गावोगावी भरणारे आठवडी बाजार हे या कांदा विक्रीसाठीची महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्या ठिकाणीच या शेतकऱ्यांच्या कांद्यांची विक्री चांगली होत असते. साधारणपणे १०० ते १५० रुपयांना एक माळ विकली जाते. यातूनच त्यांना चांगले उत्पन्न मिळते; परंतु मागील काही दिवसांपासून वसई-विरार भागात करोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढू लागला आहे. नागरिकांची होणारी गर्दी, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भरणाऱ्या आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता हा सफेद कांदा विकणार कसा असा पेच या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. करोनामुळे सलग दुसऱ्यांदा अशा विक्रीसाठी अडचणी निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

ऑनलाइन कांदा विक्री

वसईच्या भागातील पांढरा कांदा तयार झाला आहे. मात्र विक्रीसाठी आठवडी बाजार खुले नसल्याने कांद्याच्या तयार केलेल्या माळा विकण्यासाठी आता हे शेतकरी कांदा वाहनात भरून एखाद्या गावाच्या ठिकाणी, नातेवाईक आदी ठिकाणी जाऊन कांदा विक्रीचा प्रयत्न करीत आहेत. त्यासोबतच काही शेतकऱ्यांनी समाजमाध्यमावरून कांदा उपलब्ध असल्याची जाहिरात करून या कांद्याची विक्री केली जाऊ  लागली आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु केलेला खर्च निघून दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

दरवर्षी आम्ही पांढऱ्या कांद्याची लागवड करतो. तयार झालेला कांदा विविध ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारात विकतो. या कांद्याला चांगली मागणी असल्याने कांदा शेवटपर्यंत मागणीतच राहतो. मात्र आता आठवडी बाजारही बंद आहेत. ज्यांना माहीत आहे, ते शेतावर येऊन घेऊन जातात. तरीही झालेले कांद्याचे उत्पादन व होणारी विक्री यामध्ये मोठी तफावत असून जर कांदा वेळेवर विकला गेला नाही तर त्याची पडून नासाडी होण्याची शक्यता आहे. – शरद किणी, पांढरा कांदा उत्पादक शेतकरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:03 am

Web Title: problem of selling onions to white onion growers akp 94
Next Stories
1 वसई-विरार शहरात पुन्हा रक्तसंकट
2 नायगावमधील इमारतीचा भाग खचला
3 ठाणे शहरात करोना रुग्णांसाठी अतिरिक्त अडीच हजार खाटांची व्यवस्था
Just Now!
X