मुखपट्टीचा वापर न करता चक्क घोळक्याने छायाचित्रण

भाईंदर : एकीकडे पालिका  प्रशासन सामान्य नागरिकांनवर  मुखपट्टीचा वापर न केल्यास  दंडात्मक कारवाई  करत आहे तर दुसरीकडे चक्क आयुक्त आणि महापौर दालनाबाहेर  पालिकेतील नगरसेवक मुखपट्टीचा वापर न करता घोळका करत फोटो काढत असल्याचे दिसून आल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात  करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे, त्यामुळे पालिका प्रशासनाकडून प्रत्येक नागरिकाची करोना तपासणी करण्यात येत असून लाखो रुपये जनजागृती करण्याकरिता खर्च करण्यात येत आहेत. त्याच प्रकारे मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी प्रभाग समिती सभापतीपदाचे नामांकन भरण्याकरिता शहरातील नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात हजेरी लावली होती. परंतु या प्रसंगी काही नगरसेवकांनी  महापौर आणि आयुक्त दालनाबाहेरच मुखपट्टी न लावता वावर केल्याचे दिसून आले.

एवढेच नाही तर  चक्क या नगरसेवकांनी पालिका दालनाबाहेर  जवळ जवळ उभे राहून छायाचित्रण  केले. यात भाजप नगरसेविका मीना कांगणे, अंजली मुखर्जी, हेमा बेलानी, भावना भावसार आणि विनिता नाईक  यांचा समावेश होता. नगरसेविकांनीच असे कृत्य  केल्याने सामाजिक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.