ठाणे महापालिकेतर्फे २६ ठिकाणी ध्वनिनियंत्रण यंत्रणा; शैक्षणिक संस्था, रुग्णालयांच्या परिसरात ध्वनिरोधक भिंती
ठाणे शहरात वाहनांच्या अविरत वर्दळीमुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आता महापालिकेने तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण क्षेत्रातील संशोधक संस्था असलेल्या ‘निरी’च्या अहवालानुसार शहरात २६ ठिकाणी ध्वनिरोधक भिंती उभारल्या जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. शाळा, महाविद्यालये, सिग्नल शाळा आणि रुग्णालयांच्या परिसरात प्रामुख्याने अशा भिंती उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच शहराच्या अनेक भागांत दिवसरात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. या वाहनांच्या तसेच त्यांच्या हॉर्नच्या आवाजामुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषणही निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक त्रास शाळा-महाविद्यालयांचा परिसर, रुग्णालये यांना होत असतो. जुन्या ठाण्यातील गोखले मार्ग, उथळसर, पाचपाखाडी अशा भागांमध्ये रस्त्यांच्या लगतच शाळा, रुग्णालयांची उभारणी झाली आहे. रहदारीच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजामुळे विद्यार्थी आणि रुग्णांना त्रास होतो, अशा तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे या सर्वाचा अभ्यास करून आवश्यक त्या ठिकाणी ध्वनिरोधक यंत्रणा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय, सिग्नल शाळा, प्लॅटफार्म शाळा आणि रुग्णालये अशा २६ ठिकाणचा प्रशासन निरी संस्थेच्या माध्यमातून शास्त्रीयदृष्टय़ा अभ्यास करणार आहे. या अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे त्याठिकाणी ध्वनिनियंत्रण योजना राबविली जाणार आहे. या योजनेत ध्वनिरोधक भिंती उभारल्या जाणार आहेत. तीन हात नाका पुलाखाली सिग्नल शाळा चालविण्यात येते. सर्वाधिक वाहनांच्या वर्दळीचे ठिकाण म्हणून तीन हात नाका परिसर ओळखला जातो. वाहनांने गजबजलेल्या या भागात मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. त्याचा परिणाम सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होतो. मात्र, महापालिकेच्या ध्वनिनियंत्रण योजनेमुळे येथील विद्यार्थ्यांची ध्वनिप्रदूषणातून सुटका होण्याची चिन्हे आहेत.
कळवा रुग्णालयालाही दिलासा
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोरील रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. नवी मुंबईला जाण्यासाठी या मार्गाचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. त्यात तिसऱ्या खाडी पुलाचे काम सुरू असून येत्या वर्षांअखेर हे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाहनांच्या वर्दळीच्या आवाजाचा त्रास रुग्णालयातील रुग्णांना होतो. त्यामुळे रुग्णालयाभोवती ध्वनिरोधक भिंती उभारण्याची घोषणा आयुक्त जयस्वाल यांनी केली आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे.