मनुष्यबळाच्या अभावामुळे अत्याधुनिक यंत्रणा निव्वळ शोभेपुरती

मुंबईतील २६/११ च्या घटनेनंतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांतील घातपाती कारवाया रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आल्या, त्यात ठाणे स्थानकाचाही समावेश आहे. मात्र पुरेशा मनुष्यबळाअभावी या यंत्रणा शोभेच्या ठरल्या असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दहा फलाट असलेल्या ठाणे स्थानकात ये-जा करण्यासाठी त्यापेक्षा अधिक वाटा आहेत. त्यामुळे स्थानकात कुठल्या दिशेने कोण शिरेल, याचा काहीही नेम नाही. त्यात रेल्वे प्रशासनाने उपचार म्हणून फलाट क्र. २ आणि दहावर बसविलेले धातू संशोधक यंत्र (मेटल डिटेक्टर) आणि लगेज स्कॅनिंग मशिन निरुपयोगी आहे. या दोन ठिकाणी सुरक्षारक्षकही नसतात. त्यामुळे येथून दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची सुरक्षा अक्षरश: वाऱ्यावर आहे.

धातू संशोधक यंत्रही शोभपुरते

ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिम दिशेने विविध १२ ठिकाणांहून प्रवेश करता येतो. त्यामध्ये कोपरीच्या दिशेला दोन अधिकृत प्रवेशद्वारे असून स्थानकाला जोडणारे स्कायवॉक आणि इतर अनधिकृत सहा ठिकाणांवरून रेल्वे स्थानकात येता येते. अधिकृत प्रवेशद्वारेवगळता कुठेही धातू संशोधक यंत्र (मेटल डिटेक्टर) नाहीत तर पश्चिम दिशेलाही तीन ठिकाणांमधून स्थानकात अधिकृतपणे प्रवेश करता येतो. तसेच, चेंदणी दिशेने रुळातून चालत येऊन, एस.टी. थांब्याच्या स्कायवॉकवरून आणि बी-केबिन दिशेच्या लोहमार्ग (जीआरपी) पोलीस ठाण्याकडून थेट रेल्वे स्थानकात येता येते. मात्र यातील सॅटिसखालील तिकीट खिडकीशेजारी असणाऱ्या प्रवेशद्वाराजवळच हे यंत्र (मेटल डिटेक्टर) बसविण्यात आले आहेत. मात्र तेथील मेटल डिटेक्टरही एका कोपऱ्यात अनेक दिवसांपासून धूळ खात पडले असल्याचे दिसून येते. या संबंधी वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांना विचारणा केली असता, ही अत्याधुनिक यंत्रणा चालविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच मुंबई आणि उपनगरातील स्थानकांवरील यंत्रे चालविण्यासाठी एकूण ४०० मनुष्यबळाची आवश्यकता असून यासाठी प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.