बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वत:हून बांधकामे हटवली
ठाणे शहरातील अतिशय वर्दळीचा मार्ग म्हणून परिचित असलेल्या महापालिका मुख्यालय ते हरिनिवास या मार्गावरील हॉटेल तसेच दुकानांपुढील वाढीव बांधकाम तसेच बेकायदा शेड्स हटविण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने बुधवारी केली. या कारवाईमध्ये दुर्गाविहार, उत्सव या हॉटेलसह अन्य बडय़ा खाद्य पदार्थाच्या दुकानासमोरील शेड हटविण्यात आल्या. त्याचप्रमाणे गोखले तसेच राम मारुती रोडवरील दुकानांच्या शेड काढण्याची कारवाई सुरू होती. दरम्यान, कारवाई अटळ असल्यामुळे बहुतेक व्यापारी स्वत:हून दुकानापुढील शेड्स काढताना दिसून आले.
ठाणे शहरातील विविध रस्त्यांवर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह भेदण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली. या मोहिमेत गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यालगतची बाधित होणारी दुकानांची बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू आहे. याशिवाय, रस्त्यालगतच्या दुकानांपुढे वाढीव बांधकामे आणि शेड हटविण्याची कारवाई सुरू आहे. वर्तकनगर येथील पोखरण रस्ता आणि ठाणे स्थानक परिसर यापाठोपाठ आता महापालिका प्रशासनाने पाचपाखाडी भागाकडे मोर्चा वळविला आहे. ठाणे महापालिका मुख्यालय परिसरातील हॉटेल तसेच दुकान व्यावसायिकांनी वाढीव बांधकाम तसेच बेकायदा शेड उभारल्याची बाब आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या पथकाने बुधवार सकाळपासून ही कारवाई सुरू केली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणे महापालिका मुख्यालय ते हरिनिवास आणि महापालिका मुख्यालय ते आराधना टॉकीज या दोन्ही मार्गावर ही कारवाई करण्यात आली.