मुंबई-अहमदबाद महामार्गावरील वर्सोवा येथील नवीन खाडी पुलाच्या दुरुस्ती कामासाठी लागू केलेले वाहतूक बदल राबविण्यावरून ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाला सोमवारी अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

वाहतूक बदलामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक सेवकांसह आवश्यक सामुग्री देण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिल्यामुळे ठाणे पोलिसांनीही आता वाहतूक बदलांना हिरवा कंदील दाखविला आहे. तर मंगळवार (२७ नोव्हेंबर) सायंकाळपासून हे वाहतूक बदल लागू करण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. या बदलांमुळे वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

वर्सोवा येथील नवीन खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सोमवारपासून हाती घेण्यात येणार होते. मात्र, वाहतूक बदलांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी पूर्ण तयारी झालेली नसल्याचा दावा करीत ठाणे वाहतूक पोलिसांनी हा बदल पुढे ढकलण्याचा आग्रह धरला होता. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्याचेही वाहतूक पोलिसांनी ठरविले होते. तर पालघर जिल्हा प्रशासन मात्र सोमवारपासून वाहतूक बदल लागू करण्याच्या निर्णयावर ठाम होते. या दोन्ही जिल्ह्य़ातील प्रशाकीय यंत्रणातील समन्वय अभावामुळे वाहतूक बदलांबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

पालघर जिल्हा प्रशासन वाहतूक बदलांसाठी आग्रही असले तरी अजूनपर्यंत वाहतूक बदल लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावरून पूर्वीप्रमाणेच अवजड वाहतूक सुरू होती. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा आणि संविधान दिन असल्यामुळे वाहतूक बदल राबविण्यास सुरुवात केली नसल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. मंगळवार सायंकाळपासून मात्र हा बदल लागू केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्राधिकरणाने शंभर वाहतूक सेवकांसह आवश्यक सामुग्री आणि सूचना फलक देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. मंगळवार सकाळपर्यंत वाहतूक सेवक आणि सामुग्री मिळाल्यानंतर बदलांसाठी लगेचच वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल, असेही उपायुक्त काळे यांनी सोमवारी स्पष्ट केले.

वाहतूक कोंडी टाळण्याचे प्रयत्न

पुलाच्या कामामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सुरत-दहिसर या मार्गिकेवरील अवजड वाहतूक मनोर, शिरसाटफाटा आणि चिंचोटी मार्गे भिवंडीतून वळविण्यात येणार आहे. अवजड वाहतुकीचा भार वाढून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक सेवक देण्यासह आवश्यक सामुग्री देण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे.