लोकल सुरू करण्याची उपनगरी रेल्वे महासंघाची मागणी

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरातून मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरातील बोरिवली, वांद्रे, वसई-विरार पट्टय़ात नोकरीसाठी जाणाऱ्या नोकरदारांना करोनापेक्षा प्रवासासाठी योग्य वेळी वाहन मिळेल की नाही ही चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरात लवकर लोकल गाडय़ा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी उपनगरीय रेल्वे महासंघाने केली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाकडून टाळेबंदी शिथिल केली जात आहे. व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. सरकारी, खासगी कार्यालयातील उपस्थितीला ३३ टक्के परवानगी देण्यात आली आहे. अशा वेळी सार्वजनिक वाहतुकीसाठी नियम मात्र कडक करून प्रवाशांना नाहक त्रास दिला जात आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे. कल्याण रेल्वे स्थानकात बारकोड नसलेल्या प्रवाशांना सरकारी ओळखपत्र दाखविले तरी रेल्वे पास मिळतो. डोंबिवली रेल्वे स्थानकात मात्र, फलाटावरील प्रवेशद्वारावरच बारकोड नसेल त्या कर्मचाऱ्यांना अडवून ठेवले जाते.  एकीकडे कार्यालयातील उपस्थिती सक्तीची केली जात आहे. दुसरीकडे प्रवासासाठी एस.टी., कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन, नवी मुंबई पालिका परिवहन यांच्या बससेवा एक ते दीड तास रांगेत उभे राहूनदेखील मिळत नाहीत. त्यामुळे कार्यालयात वेळेवर पोहचता येत नाही, अशी माहिती उपनगरी रेल्वे महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी दिली.

कार्यालयात तीन दिवसांची उपस्थिती सक्तीची आहे. या दिवसांमधील एक दिवस प्रवासाचे कारण देऊन दांडी मारली तरी संपूर्ण आठवडय़ाची सुट्टी लावण्याचे प्रकार काही कार्यालयांमध्ये सुरू आहेत, असा अनुभव केशर गोखले या महिलेने सांगितला. डोंबिवली, कल्याणमधून बसने दादर, नरिमन पॉइंट, नवी मुंबई, गोरेगाव, चेंबूर प्रवासासाठी दररोज वाहतूक कोंडी, खड्डे यांच्यामुळे तीन ते चार तास लागतात.  खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या सरकारी सेवा कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक आहे.  हा वर्गही  खूप त्रस्त आहे. या कर्मचाऱ्यांचे हाल विचारात घेऊन राज्य शासन, रेल्वेने गांभीर्याने विचार करून लोकल फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी उपनगरी रेल्वे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली आहे.

कल्याण ते गोरेगाव चार तास प्रवास

गोरेगाव येथील महानंद डेअरीमधील बहुतांशी कर्मचारी डोंबिवली, कल्याणमधील आहेत. महानंद डेअरी हा सरकारचा अंगीकृत उपक्रम आहे. या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळणे आवश्यक आहे. महानंदच्या कर्मचाऱ्यांना कल्याण, डोंबिवलीतून नेण्यासाठी खास बस येते. ही बस सकाळी आठ वाजता गोरेगावच्या दिशेने निघाली की पोहचण्यासाठी साडेअकरा वाजतात असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. महिला कर्मचाऱ्यांची संख्या यामध्ये अधिक आहे. मासिक पाळी किंवा स्वच्छतागृहाची गरज वाटली तर महिला प्रवाशांची सर्वाधिक अडचण येते. संध्याकाळी साडेपाच वाजता गोरेगावहून निघालेली बस डोंबिवली, कल्याणमध्ये येण्यासाठी रात्रीचे १० वाजतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

नवी मुंबई बस थांब्यावरील प्रवाशांचे हाल

डोंबिवली मध्यवर्ती ठिकाणचा कोपर उड्डाण पूल गेले वर्षभर बंद आहे. नवी मुंबई परिवहन सेवेच्या बस डोंबिवली पश्चिमेत जाऊ शकत नाहीत. या बस पूर्व भागातील टंडन रस्त्यावरील चौकात उभ्या करून तेथून सोडल्या जातात. या चौकात प्रवाशांसाठी कोणताही थांबा नाही. बस येईपर्यंत प्रवाशांना छत्री, रेनकोट सांभाळत पावसात उभे राहावे लागते.  या थांब्यावर परिवहन उपक्रमाने तात्पुरता निवारा उभारण्याची मागणी प्रवाशांनी नवी मुंबई परिवहन उपक्रमाकडे केली आहे. त्याला व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.