News Flash

स्वगते, कविता आणि व्यक्तिचित्रण

कथा-कादंबऱ्या वाचायला मला आवडतात. मात्र त्या वाचण्यासाठी लागणारी चिकाटी अथवा धीर माझ्यात नाही.

मी मूळची ठाणेकर. कळवा हे माझे माहेर. लहानपणी पुस्तके वाचायची सवय लागली ती माझ्या वडिलांमुळे. वडिलांचे वाचन अफाट होते. त्यामुळे घरात अनेक पुस्तके होती. वडिलांशिवाय घरात दुसरे कुणी वाचन करणारे नव्हते. कळव्यात राहत असताना जवाहर वाचनालयाची मी सभासद होते. या वाचनालयाच्या माध्यमातून लहानपणी नामवंत लेखकांच्या सकस लेखनाची ओळख झाली. सुहास शिरवळकर, मंदाकिनी भडभडे, बाबा कदम यांची पुस्तके वाचली. अभिनय ही माझी आवड असल्याने नाटकांची पुस्तके माझ्याकडून खूप वाचली गेली. ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘एकच प्याला’ अशी नाटके तसेच मृच्छकटिकसारखी संस्कृत नाटके लहान वयात वाचली. एकपात्रीसाठी नाटकाचे काही प्रसंग, उतारे याची गरज होती. त्यानिमित्तानेही नाटकांचे वाचन झाले. इंदिरा संतांच्या, कुसुमाग्रजांच्या कविता वाचल्या. कविता वाचून तो आनंद आत्मसात करायला शिकले.

कथा-कादंबऱ्या वाचायला मला आवडतात. मात्र त्या वाचण्यासाठी लागणारी चिकाटी अथवा धीर माझ्यात नाही. गो. नी. दांडेकरांचे ‘पडघवली’ मी वाचले. श्री. ना. पेंडसेंचे ‘एक होती आजी’ हे पुस्तक  माझ्या सर्वाधिक आवडीचे आहे. या पुस्तकाबद्दल माझी विशेष आठवण आहे. ‘एक होती आजी’ हे पुस्तक मी शाळेत असताना ग्रंथालयातून वाचायला घेतले होते. त्या वेळी काही कारणास्तव माझे हे पुस्तक वाचायचे अर्धवट राहिले होते. ही खंत माझ्या मनात कायम होती. मात्र एकदा गुहागरला शुटिंगच्या निमित्ताने गेलेले असताना तिथल्या प्रॉपर्टीजमध्ये काही पुस्तके ठेवलेली होती. त्या पुस्तकांमध्ये ते पुस्तक मला मिळाले. एखादी हरवलेली अमूल्य गोष्ट मिळाल्याचा आनंद मला त्या वेळी झाला होता. शूटिंगच्या पंधरा दिवसांत मी ते पुस्तक वाचून पूर्ण केले.

व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके मला आवडतात. हसरे दु:ख, एक होता काव्‍‌र्हर, राजा शिवछत्रपती ही पुस्तके मला भावली. राजा शिवछत्रपती हे पुस्तक पुन:पुन्हा वाचायला आवडते. ‘वीज म्हणाली धरतीला’मधील पूर्ण स्वगते मला तोंडपाठ आहेत. सध्या कामात व्यस्त असल्याने वाचायला वेळ मिळत नाही याची खंत आहे. मात्र ‘ऑनलाइन’ माध्यमाचा मी पुरेपूर उपयोग करते. गालिबचे शेर, गुलजार, कुसुमाग्रजांच्या कविता कायम मनाला स्फूर्ती देतात. सध्याचे माझे आवडते कवी म्हणजे किशोर कदम. मला या मंडळींच्या प्रतिभेचे कायम आकर्षण राहिलेले आहे. इतके प्रगल्भ लिखाण या व्यक्तींना सुचते कसे याबद्दल उत्सुकता वाटते. जीवनाचे सार चार ओळीत सांगण्याची किमया लेखक किंवा कवींना कसे सुचते हे एक कोडेच आहे. महेश एलकुंचवार यांचे मौनराग, राजीव नाईक यांची नाटकांची पुस्तके वाचली. ‘मौनराग’ या पुस्तकाचे वाचन म्हणजे माझा अभ्यास आहे. सुरेश भट, विंदा करंदीकरांच्या कविता वाचल्या. एलकुंचवार यांचे प्रतिबिंब पुस्तक मी दोन वेळा वाचले. दोन्ही वेळा त्या पुस्तकाचा मला वेगळा अर्थ गवसला. न राहवून मी त्यांना फोन केला, त्यावर ते म्हणाले तिसऱ्या वेळेला वाचशील तेव्हा तुला आणखी वेगळा अर्थ सापडेल. त्यांचे ते पुस्तक वेगवेगळ्या वयात भिन्न अनुभूती देऊन जाते. सासरी आल्यावर घरचे ज्ञानदा वाचनालय होते. त्यामुळे या ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग झाला. दासबोध वाचले. गीतरामायणाच्या सीडी घरात आहेत त्यामुळे त्यांचे श्रवण होते.

माझी मैत्रीण सोनाली विनोदी लिखाण ही खूप वाचते. ती अनेक पुस्तकांची शिफारस मला करते. त्यामुळे वाचन सोपे होते. आमच्या पुस्तकावर अनेकदा चर्चा होतात. चर्चा केल्याने कधी तरी त्याचा उपयोग मला माझे पात्र साकारताना होतो. वाचाल तर वाचाल हे आपल्याला लहानपणीच सांगितलेले असते. मात्र त्या वयात त्याचे गांभीर्य कळत नाही. आपापल्या क्षेत्रात काम करायला लागल्यावर अपुऱ्या वाचनाची खंत जाणवते. त्यामुळे तरुणांनी वाचायलाच हवे.

शब्दांकन- किन्नरी जाधव 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:47 am

Web Title: vishakha subhedar bookshelf
टॅग : Thane
Next Stories
1 तपासचक्र : ‘ब्लाइंड गेम’
2 कॉलेजच्या कट्टय़ावर : महाविद्यालयांच्या क्षितिजावरील तारका
3 भविष्याच्या दिशा दर्शविण्यासाठी एनकेटीटी महाविद्यालयात मार्गदर्शन शिबीर
Just Now!
X