रंगांचा सण असलेल्या धूलिवंदनाच्या दिवसाला अद्याप दोन आठवडे बाकी असले तरी मुंबई-ठाणेकरांना आतापासूनच त्याचे वेध लागले आहेत. रंगांची उधळण, पाण्याचे फवारे, नाचगाणी, दंगामस्ती या सगळय़ा गोष्टी करण्याची पूर्ण मुभा देणाऱ्या या सणाचे जेवणही वैशिष्टय़पूर्ण असते. मांसाहारी खाणाऱ्यांच्या घरांत त्या दिवशी कोंबडीवडे, मटणाचा रस्सा किंवा चिकन बिर्याणी असा सामिष बेत असतो, तर शाकाहारी घरांतही झणझणीत पदार्थाची ताटात गर्दी जमते. अशा मसालेदार आणि झणझणीत जेवणानंतर काही तरी गोड खाल्ले पाहिजेच. अशा वेळी नेहमीचे गोड पदार्थ न करता काही तरी नवीन करून बघायचे असेल तर कोरम मॉलमधील बुधवारच्या कार्यशाळेला नक्कीच भेट द्या. कोरम मॉलतर्फे महिलांसाठी असणाऱ्या कार्यशाळेच्या अंतर्गत मूझ पशाकाहारी घरांतही झणझणीत पदार्थाची ताटात गर्दी जमते. दार्थ बनविण्याच्या पद्धती शिकण्याची संधी मिळणार आहे. मूझ हा डेझर्ट्सपैकी असाच चविष्ट गोड पदार्थ. बहुतांश वेळा कॅफेमध्येच मिळणाऱ्या मूझ या खाद्यपदार्थावर खवय्ये आवडीने ताव मारतात. होळीनिमित्ताने या मूझला थंडाईची चव असेल तर अशा नावीन्य असणाऱ्या पाककृती खवय्यांना नक्कीच आवडतील. ‘थंडाई मूझ विथ रोज कुलिज’ यासोबत पान शॉट्स, दही भल्ले, आवधी आलू चाट, मेथी मठरी असे पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक या कार्यशाळेत दाखवण्यात येणार आहे.

कधी – बुधवार, १६ मार्च, वेळ – दुपारी ३ ते रात्री ८

कुठे – कोरम मॉल, ठाणे (प.)

रसिकांना सुराने मंत्रमुग्ध करणारा ‘चिन्मया ते मनमंदिरा’

संगीत म्हणजे चैतन्याचा एक अनोखा झराच. त्यातच ते नाटय़संगीत असेल तर दुग्धशर्करा योगच आणि हाच दुग्धशर्करा योग डोंबिवलीकर रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. संगीतामध्ये सगळ्या भावना जाग्या करण्याची ताकद आहे असे नाही तर जगात असणाऱ्या दु:खावर संगीत हा जालीम इलाज आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आणि म्हणूनच कणाकणांत असणाऱ्या या संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी १२ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता सा निर्मित अनामिक आणि टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चिन्मया ते मनमंदिरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात रसिकांना आनंद भाटे आणि महेश काळे या कलाकारांच्या आवाजातून नाटय़संगीताचा आनंद घेता येईल.

कधी- शनिवार, १२ मार्च, रात्री ८.३० वाजता

कुठे- सावित्रीबाई फुले नाटय़ मंदिर, डोंबिवली (पू.)

विनोदाच्या बादशहासोबत हास्यसफर

मेहमूदपासून केष्टो मुखर्जीपर्यंत आणि टुणटुणपासून अगदी अलीकडच्या काळातील भारती सिंहपर्यंत अनेक विनोदी कलावंतांनी आपल्या अभिनयातून, संवादफेकीतून हिंदी चित्रपट प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले. अलीकडच्या काळात तर टीव्हीवरील विविध वाहिन्यांवर काही ना काही विनोदी कार्यक्रम सुरूच असतात; परंतु या सगळय़ा  विनोदी कलाकारांच्या जत्रेत एक नाव असे आहे, की जे उच्चारताच चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटते. ते म्हणजे जॉनी लिव्हर. पिंजारलेले कुरळे केस, मोठमोठे डोळे, बोलण्याची वेगळी लकब, चटकन संवादफेक आणि हास्याभिनय यामुळे जॉनी लिव्हर यांनी चित्रपटरसिकांच्या मनात अढळ स्थान पटकावले आहे. मधल्या काळात चित्रपटाच्या पडद्याआड गेलेला हा कलाकार आता परत हिंदी चित्रपटांमधून चमकू लागला आहे; पण जॉनी लिव्हर यांचा रंगमंचावरील थेट अभिनय आणि सादरीकरण पाहण्याचा आनंद त्याहूनही आगळा असतो. विविध कलाकारांच्या नकला करत सादर होणारा त्यांचा एकपात्री कार्यक्रम नेहमीच गर्दी खेचतो. असाच एक कार्यक्रम ‘जॉनी लिव्हर लाइव्ह’ येत्या रविवारी ठाण्यात होणार असून त्यात जॉनी लिव्हर यांच्या गमतीजमती आणि विनोद पाहण्याची, ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे.

कधी – रविवार, १३ मार्च, वेळ –  रात्री ८.३० वाजता

कुठे – डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे (प.)

ठाणेकरांसाठी रॉक-बॅण्डचा नजराणा

शनिवारची संध्याकाळ ही सगळ्यांचीच आवडती संध्याकाळ. दुसऱ्या दिवशी सुट्टीचा आस्वाद घ्यायचा असतो; परंतु आपली ही सायंकाळ जोरदार साजरी करण्यासाठी विवियान मॉलने तशी व्यवस्था केलेली आहे. आठवडय़ाच्या प्रत्येक शनिवारी विवियाना मॉलमध्ये ‘व्ही-फॉर म्युझिक’ या लाइव्ह रॉक संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद ठाणेकरांना घेता येणार आहे.

कधी- शनिवार, १२ मार्च, वेळ- सायंकाळी ६ वाजता

कुठे- विवियाना मॉल, ठाणे (प.)  

रांगोळी काढू दारी..

दारासमोर रांगोळी काढणे म्हणजे शुभाचे लक्षण मानले जाते. पूर्वी रेखाटण्यात येणाऱ्या ठिपक्यांच्या रांगोळीची जागा आता संस्कार भारती रांगोळीने घेतली. दारासमोर किंवा सभागृहासमोर रेखाटण्यात येणारी ही रांगोळी नेहमीच सर्वाचे लक्ष वेधते. म्हणूनच रेखा पाठक यांनी स्वत:कडे असणारी रांगोळी काढण्याची

कला इतरांनाही अवगत व्हावी यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत संस्कार भारती रांगोळीबरोबरच पाण्यावरची रांगोळी, धान्याची, मिठाची आणि चहाची रांगोळी शिकवली जाणार आहे. ही कार्यशाळा १२ ते १३ मार्च रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत विवेकानंद सोसायटी, गुरुमंदिर रोड, सारस्वत कॉलनी ,जोशी हायस्कूलजवळ, डोंबिवली पूर्व येथे होणार आहे.

कधी- १२ ते १३ मार्च, वेळ- दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजता.

कुठे- बी विंग/३०, बिल्डिंग क्रमांक १२, विवेकानंद सोसायटी, गुरुमंदिर रोड, सारस्वत कॉलनी, डोंबिवली (पूर्व)

कॅनवासवरचा ‘निसर्ग’

पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासामुळे निसर्गसौंदर्य पाहण्याठी भाग्य लागते, असे म्हणण्याची वेळ आली आहे; परंतु आपण आजवर अनुभवलेल्या किंवा आपल्या मनातील निसर्ग कॅनवासवर उतरविण्यासाठी खास निसर्गचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील बिग आर्ट इन्स्टिटय़ूटच्या वतीने शनिवार, १२ व रविवार, १३ असे दोन दिवस सकाळी ११ ते ५ या वेळेत ‘निसर्गचित्र’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. १११, लोढा सुप्रिमोज, नवीन पासपोर्ट कार्यालयाच्या पुढे, रोड नं. २२, वागळे इस्टेट, ठाणे येथे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये निसर्गचित्रांचा अभ्यास, ते करतानाचे बारकावे तसेच जलरंग कसे हाताळावेत याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२५८०६६०८ किंवा ९९३०८०४५२२

कधी- शनिवार, १२ व रविवार, १३, वेळ- सकाळी ११ ते ५

कुठे- १११, लोढा सुप्रिमोज, नवीन पासपोर्ट कार्यालयाच्या पुढे, रोड नं. २२, वागळे इस्टेट, ठाणे (प.)

महिलांना सुगम संगीताचे धडे

कुटुंब, नोकरी, मुले यांच्यामधून वेळ काढून एखादी कला जोपासणे सगळ्यांना शक्य होत नाही. त्यासाठी ठाण्यातील संस्कार भारती कोकण प्रांततर्फे खास ‘३० वर्षांवरील’ महिलांसाठी ‘सुगम संगीत’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून संगीताची आवड असणाऱ्या महिलांना आपली कला जोपासण्याची उत्तम संधी संस्कार भारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भरतमुनी जयंतीचे औचित्य साधून रविवारी या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात येईल. नावनोंदणीसाठी संपर्क-९८६९०४५०२०, ९९३००७८१९९.

कधी- रविवार, १३ मार्च वेळ- सायंकाळी ५ ते रात्री ८

कुठे- बेडेकर विद्यामंदिर, विद्यालंकार सभागृह, नौपाडा, ठाणे (प.)