डोंबिवली- शासनाचा निर्मल ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळालेल्या डोंबिवली जवळील खोणी गावात ५५ घरांमधील वीज चोरी आज महावितरणच्या विशेष पथकाने पकडली. पलावा नागरी वसाहतीमुळे खोणी गावाचे रुप बदलले आहे. गावचे महसुली उत्पन्न वाढल्याने कल्याण तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणी ग्रामपंचायत ओळखली जाते. या गावातील ग्रामस्थांनी काल महावितरणच्या वीज चोरी तपासणी पथकावर हल्ला केल्याने याविषयी सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या ग्रामपंचायतीचा निर्मल ग्रामपंचायतीचा पुरस्कार काढून घेण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. पलावा गावाच्या चारही बाजुने पलावा नागरी वसाहत विकसित झाली आहे. या वसाहतीमुळे कल्याण तालुक्याच्या वेशीवरील आणि डोंबिवली जवळील गाव म्हणून खोणीची ओळख आहे. गावचे रुप देखणे झाले आहे. आकर्षक घरे, देखणे काँक्रीटचे रस्ते, मंदिरे अशी गावाची ठेवण आहे. महावितरणचे भरारी पथक बुधवारी खोणी गावात वीज मीटर तपासणीसाठी गेले तेव्हा ग्रामस्थांच्या जमावाने पथकावर हल्ला केला. एका पोलिसाला गंभीर जखमी केले. पथकाच्या वाहनाची तोडफोड केली. गावात परत पाऊल ठेवले तर जीवे मारण्याची धमकी ग्रामस्थांनी दिली होती. या हल्ल्या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
खोणी ग्रामस्थांना धडा शिकवण्यासाठी गुरुवारी सकाळीच महावितरणचे २०० हून अधिक कर्मचारी, अभियंत्यांची २१ पथके मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एकावेळी ३० पोलिसांच्या बंदोबस्तात खोणी गावात गेली. गावाच्या वेशीवर दोन पोलीस पिंजरे तैनात करण्यात आले. एकावेळी मोठा फौजफाटा गावात घुसल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली. गावातील २५४ वीज ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करण्यात आली. ५८ जणांनी मीटरमधून थेट वीज पुरवठा घेतला होता. १९ जणांचे मीटर संशयास्पद आढळले. ग्रामस्थांच्या भ्याड हल्ल्यानंतर पथकांनी आक्रमकपणे गावात तपासणी मोहीम राबवली.
या कारवाईत महावितरणचे उपसंचालक सुमित कुमार, अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड, उप कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सुनील तारमळे, अविनाश वणवे, मदने, सहभागी झाले होते.
“ वीज चोरांविरुध्द कायदेशीर, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. अनेक वीज ग्राहकांचे वीज मीटर काढुनही त्यांनी अनधिकृतपणे वीज पुरवठा घेतल्याचे, वीज वाहिनीत छेडछाड केली असल्याचे आढळले. परिसरातील गावांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.