जिल्ह्य़ासाठी दिलासादायक बाब; नवीन रुग्णांपेक्षाही बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

ठाणे : गेल्या महिनाभरापासून दररोज सरासरी अठराशे ते दोन हजार करोना रुग्णांची नोंद करणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील रुग्णसंख्येत फारशी घट होत नसली तरी, करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या बाधितांचे प्रमाण जास्त असून एकूण बाधितांपैकी ७५ टक्के आतापर्यंत बरे झाले आहेत. जिल्ह्य़ात एकूण बाधितांपैकी २२ टक्केच रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. परिणामी आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण बऱ्याच अंशी कमी झाला आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागासह ग्रामीण भागात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या शहरांसह अंबरनाथ, बदलापूर, मीरा, भाईंदर या शहरांसह ग्रामीण पट्टय़ातही करोना रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्य़ात करोना चाचण्या आणि प्रतिजन चाचण्यांसह घरोघरी सर्वेक्षणात वाढ झाली आहे. त्यामुळेही अधिकाधिक रुग्णांचा छडा लागत आहे. त्याच वेळी करोनातून मुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्य़ात ९१ हजार १०२ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ६८ हजार ५९८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ७५.३० टक्के आहे, तर सध्या केवळ १९ हजार १०२ रुग्ण जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी उपचार घेत असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २१.५५ टक्के इतके आहे. तसेच एकूण रुग्णांपैकी २ हजार ५१६ रुग्णांचा आत्तापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या महिन्यामध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसाला ४५० ते ५०० नवे रुग्ण आढळून येत होते, तर, ठाणे शहरातही दररोज ४०० ते ४५० जणांना करोनाची लागण होत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यापाठोपाठ उल्हासनगर शहरामध्ये प्रत्येक दिवशी २०० ते २३० जणांचे करोना अहवाल सकारात्मक येत होते. त्यामुळे या तीनही शहरांची परिस्थिती चिंताजनक बनली होती. मात्र आता कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरात दिवसाला २०० ते २५० नवे रुग्ण आढळून येत आहेत, तर उल्हासनगर शहरात दिवसाला केवळ ५० ते ७० नवे रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर सर्वेक्षणावर भर दिल्यामुळे भिवंडीतील रुग्णसंख्याही कमी झाली आहे.

शहरनिहाय करोना रुग्णांची स्थिती

शहर                         करोनामुक्त            सक्रिय         एकूण रुग्ण

कल्याण-डोंबिवली       १५५९८                ५०६८               २१०६१

ठाणे                             १५७८४               ३७०७               २०१५६

नवी मुंबई                    ११३६१                ४८८१              १६६७९

मीरा-भाईंदर                   ७१७४             १३६२                ८८२४

उल्हासनगर                   ५८०८              १०३५                ६९८८

ठाणे ग्रामीण                  ४५४४              २२४३                ६९५९

अंबरनाथ                     ३३२३                ४६८                  ३९४९

बदलापूर                       २३२८             ४३०                  २८०६

भिवंडी                          ३०३८           ४३९                   ३६८५