ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात सक्त कारवाईचे आदेश दिल्यानंतर आयुक्त संजीव जैयस्वाल यांनी मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणाविरोधात मोहीम राबविण्याचे आदेश अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांना दिले. तत्कालिन आयुक्त आर. ए. राजीव यांनी रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांविरोधात मोहीम राबवून या परिसराचे सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास नेले होते. गेल्या दीड वर्षांत मात्र याठिकाणी पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. आपल्या पहिल्या कळवा-मुंब्रा दौऱ्यात हे अतिक्रमण हटवावे, असे आदेश जैयस्वाल यांनी दिले.
ठाणे महापालिका हद्दीत मोडणाऱ्या कळवा आणि मुंब्रा परिसराची पहाणी करण्यासाठी आयुक्त जैयस्वाल यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या दोन्ही शहरांमधील वेगवेगळ्या प्रश्नांचा आढावा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुंब्रा आणि कळवा या दोन्ही रेल्वे स्थानक परिसराचा चेहरामोहरा पालटण्याचा प्रयत्न दोन वर्षांपुर्वी महापालिकेमार्फत करण्यात आला. बेकायदा फेरीवाले, मटण विक्रेते, कोंबडय़ा विक्रीची दुकानांचा या स्थानकांना विळखा पडला होता. आर.ए.राजीव यांनी विशेष मोहीम राबवून ही अतिक्रमणे हटविले आणि अधिकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन लगतच्या एका बाजारात केले. त्यानंतर या स्थानक परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे दहा कोटी रुपयांची कामे करण्यात आली. राजीव यांची बदली झाल्यानंतर मात्र या सर्व परिसराला पुन्हा एकदा बकालपणा आला. मुंब््रयातील मुख्य रस्त्यांच्या कडेला फेरीवाल्यांचा लांबच्या लांब रांगा दिसू लागल्या. कळव्यातही अतिक्रमण वाढल्याचे चित्र आहे. नवे आयुक्त संजीव जैयस्वाल यांनी काढलेल्या या परिसराच्या दौऱ्यादरम्यान त्यांना जागोजागी अतिक्रमण दिसून आले. त्यानंतर मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणाविरोधात तातडीने कारवाई हाती घ्यावी, असे आदेश त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.
या दौऱ्या दरम्यान, कळवा-मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत पाणी बिलांची तसेच मलमत्ता कराच्या वसुलीचा आढावाही जैयस्वाल यांनी घेतला. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाची पहाणी करुन हे रुग्णालय अद्ययावत करण्याचे आदेश त्यांनी दिले. याच वेळी मनिषानगर येथील जुन्या जलकुंभाची पहाणी करुन धोकादायक अवस्थेतील हा जलकुंभ पाडण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. मुंब्रा येथील प्रभाग समिती कार्यालय कौसा येथील बी.एस.यु.पी प्रकल्पात स्थलांतरीत करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेली घरे, कौसा येथील क्रिडा संकुल आणि महापे-शीळ रस्त्यावरील खदाणीची पहाणीही त्यांनी केली. यावेळी महापालिकेचे नगर अभियंता रतन अवरमोल, उपायुक्त संजय हेरवाडे, के.डी.निपुर्ते, उपनगर अभियंता अनिल पाटील आदी वरिष्ठ आयुक्ता समवेत उपस्थित होते.