उल्हासनगर : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच अवघ्या काही तासात ठाणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांना उमेदवारी देताना चूक झाली, ती चूक आता सुधारायची आहे असे सांगत शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावेळी ठाकरे यांनी शक्ती प्रदर्शन केले होते.

हेही वाचा…शीतयुद्ध संपलं? कपिल पाटील किसन कथोरेंच्या भेटीसह प्रचाराची लगबग सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या पदाधिकाऱ्यांचाही या दौऱ्याला मोठा पाठिंबा दिला. त्यानंतर आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे अशा ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत येथे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार मुद्द्यावरूनही एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाने लक्ष केले होते. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.

शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. ही घोषणा झाल्यानंतर काही तासातच कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊ चौधरी, नरेश म्हस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा…भिवंडीत उमेदवारीवरून महाविकास आघाडीत स्पर्धा; सुरेश म्हात्रे, निलेश सांबरे हे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो. चंद्रकांत बोराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांचे बंधू धनंजय बोडारे अजूनही ठाकरे गटातच कार्यरत आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन सदस्य दोन्ही शिवसेना गटांमध्ये कार्यरत असल्याचे चित्र आहे. धनंजय बोडारे यांच्याकडे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणूनही पाहिले जाते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या पदाधिकाऱ्याने ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्याने शिंदेंची ताकद वाढली असल्याचे बोलले जाते.