प्रस्तावित स्थळांची शुक्रवारी पाहणी; अन्य सुविधांचाही आढावा घेणार

ठाण्यापाठोपाठ आगामी वर्षांतील साहित्य संमेलन कल्याण डोंबिवली शहरात भरविण्यात यावे, अशा स्वरुपाची मागणी कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय, डोंबिवलीतील आगरी युथ फोरमने अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे केली आहे. या मागण्यांचा विचार करून साहित्य महामंडळाचे पदाधिकारी शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी कल्याण, डोंबिवलीत यजमान संस्थांनी प्रस्तावित केलेल्या स्थळांची पाहणीसाठी येत आहेत.

डोंबिवलीत सर्वेश सभागृहात साहित्य संस्कृतीप्रेमी संस्थांच्या उपस्थितीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ध्वनी चित्रफितीद्वारे संमेलन स्थळ, नियोजनाची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह काही साहित्यप्रेमी महामंडळ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संमेलन शहरात भरविण्या बाबत चर्चा करतील. ध्वनीचित्रफितीद्वारे पाहिलेल्या मैदान स्थळाची पदाधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतील. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष वामनराव देशपांडे, कार्याध्यक्ष व साहित्यप्रेमी सुरेश देशपांडे यांनीही आगरी युथ फोरमची संमेलन शहरात व्हावे ही मागणी पूर्ण व्हावी, यासाठी शहरातील विविध सामाजिक, साहित्यप्रेमी संस्थांनी एकत्रित यावे, असे आवाहन केले आहे. दोन्ही ठिकाणच्या स्थळांची पाहणी केल्यानंतर संमेलन कोठे भरवायचे याबाबतचा अंतिम निर्णय महामंडळाचे पदाधिकारी घेणार आहेत.

विविध मान्यवरांचा सहभाग

या पहाणी दौऱ्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. ओरके (नागपूर), उज्ज्वला मेहेंदळे, डॉ. देशपांडे (मुंबई), दादा गोरे (औरंगाबाद), साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रकाश पायगुडे (पुणे), डॉ. भाले (भोपाळ) यांचा समावेश असणार आहे. ऐतिहासिक, साहित्यिक-सांस्कृतिक संदर्भ असलेल्या या दोन्ही शहरांमध्ये आगामी साहित्य संमेलन घेण्यात यावे, यासाठी कल्याण, डोंबिवलीतील दोन्ही संस्थांनी यजमानपदासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. शहरातील मोठी मैदाने, तेथील सुविधा, मैदानाच्या लगतच्या निवासी व अन्य सुविधांची माहिती साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ध्वनीचित्रफितीद्वारे (पॉवर पाईंट प्रेझेंटेशन) दाखविण्यात येणार आहे.

आगरी युथ फोरमने आगामी साहित्य संमेलन डोंबिवलीत भरवावे, म्हणून मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत साहित्य महामंडळाचे पदाधिकारी डोंबिवलीत येत आहेत. त्याचप्रमाणे कल्याणमधील संस्थांची हीच मागणी असल्याने पदाधिकारी तेथेही जाणार आहेत. अंतिम निर्णय महामंडळ पदाधिकाऱ्यांचा असतो. तरीही डोंबिवलीतील साहित्यप्रेमी, सांस्कृतिक वातावरण, येथील साहित्यिक वारसा साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमोर सादर केला जाणार आहे.

 – सुरेश देशपांडे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, डोंबिवली