ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी १६ जागांवर महायुतीने विजय मिळविला आहे तर, केवळ दोनच जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. भाजपने ९ पैकी ९, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ पैकी ६ जागा तर अजित पवार यांनी २ पैकी १ जागा जिंकली आहे. महाविकास आघाडीला दोनच जागा मिळाल्या असून ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेला जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. राज्यातील मनसेचे एकमेव आमदार असलेले प्रमोद (राजू) पाटील हे कल्याण ग्रामीण मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पुुर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पुर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मिरा-भाईंदर, ओवळा-माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या मतदार संघाचा समावेश आहे. यामध्ये शहरी आणि ग्रामीण अशा मतदार संघांचा समावेश आहे. या १८ मतदार संघामधून २४४ उमेदवार निवडणुक लढवित आहेत. ठाणे जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. काही ठिकाणी मनसे उमेदवारांमुळे तिरंगी लढत होती. या निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी १६ जागांवर महायुतीने विजय मिळविला आहे तर, केवळ दोनच जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत.

हेही वाचा >>>मुरबाडमध्ये कथोरेंनी चक्रव्युव्ह भेदले, ५० हजारांहून अधिक मतांची विजयी आघाडी

ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी ९ जागा भाजपने लढविल्या. यामध्ये भिवंडी पश्चिमेतील उमेदवार महेश चौगुले, मुरबाडमधील उमेदवार किसन कथोरे, उल्हासनगरमधील उमेदवार कुमार आयलानी, कल्याण पुर्वमधील उमेदवार सुलभा गायकवाड, डोंबिवलीमधील उमेदवार रविंद्र चव्हाण, मिरा-भाईंदरमधील उमेदवार नरेंद्र मेहता, ठाणे शहरमधील उमेदवार संजय केळकर, ऐरोलीमधील उमेदवार गणेश नाईक, बेलापूरमधील उमेदवार मंदा म्हात्रे यांचा समावेश होता. हे सर्वच उमेदवार विजयी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ जागा लढविल्या. त्यापैकी भिवंडी ग्रामीणमधील उमेदवार शांताराम मोरे, अंबरनाथमधील उमेदवार डाॅ. बालाजी किणीकर, कल्याण पश्चिमेतील उमेदवार विश्वनाथ भोईर, कोपरी-पाचपाखाडी उमदेवार एकनाथ शिंदे, ओवळा-माजिवडामधील उमेदवार प्रताप सरनाईक, कल्याण ग्रामीणमधील उमेदवार राजेश मोरे हे सहा उमेदवार विजयी झाले तर, भिवंडी पुर्वमधील उमेदवार संतोष शेट्टी यांचा पराभव झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने दोन जागा लढविल्या होत्या. त्यापैकी शहापूरमधील उमेदवार दौलत दरोडा हे विजयी झाले तर, कळवा-मुंब्रामधील उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव झाला.

हेही वाचा >>>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आनंदोत्सव; कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

महाविकास आघाडीला केवळ दोनच जागा

कळवा-मुंब्रा मतदार संघातील राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवार जितेंद्र आव्हाड आणि भिवंडी पुर्वेतील समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस शेख हे दोन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडीला केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत. तर, राज्यातील मनसेचे एकमेव आमदार असलेले प्रमोद (राजू) पाटील हे कल्याण ग्रामीण मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

बहिणींची मते महायुतीच्या पथ्थ्यावर

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार संख्येच्या तुलनेत ५६ टक्के पुरुषांनी तर ५७ टक्के महिलांनी मतदान केले होते. यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानामध्ये एक टक्क्याने पुढे असल्याचे आकडेवारीतून दिसून आले होते. यानिमित्ताने जिल्ह्यात बहिणी मतदानात आघाडीवर असल्याचे चित्र होते. हे महिलांचे वाढलेले मतदान महायुतीच्या पथ्थ्यावर पडल्याचे निकालावरून आता स्पष्ट होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यात महायुतीने १८ पैकी १६ विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आणि मिठाईचे वाटप करून जल्लोष साजरा केला. आनंद आश्रमाबाहेरही जल्लोष करण्यात आला.