ठाणे : शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर टेंभीनाका परिसरात चाॅपरने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यात कोकाटे यांचे एक सहकारी जखमी झाले आहे. काही दिवसांपूर्वीच सुधीर कोकाटे यांच्या मुलावर नौपाडा पोलीस ठाण्यात एका तरुणावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणातूनच हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. टेंभीनाका शाखा ही आनंद आश्रमापासून अवघ्या दोन मिनीटांच्या अंतरावर आहे. याच ठिकाणी हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेत मागील ४० वर्षांपासून सुधीर कोकाटे हे सक्रीय आहेत. ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यासोबत असत. सुधीर कोकाटे हे मागील चारवेळा ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते नेहमी टेंभीनाका येथील नवरात्र मंडळाच्या कार्यालयाबाहेर कामानिमित्ताने बसत असतात. सोमवारी रात्री सुधीर कोकाटे हे त्यांचे सहकारी किशोर गायकर, गजानन म्हात्रे, प्रसाद कांबळे यांच्यासह आणखी काही सहकाऱ्यांसोबत कामानिमित्ताने बसले होते. त्याचवेळी दुचाकी आणि रिक्षा त्याठिकाणी थांबली. महिलेसह चार ते पाचजण रिक्षा आणि दुचाकीतून उतरले. त्यातील महिलेने सुधीर कोकाटे यांच्याकडे पाहून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एकजण समोर आला. त्याच्या हातामध्ये चाॅपर होता. तो व्यक्ती कोकाटे आणि गायकर यांच्या दिशेने जाऊ लागला. कोकाटे यांचे सहकारी त्याला अडवित असताना त्याने चाॅपरने हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात गजानन म्हात्रे यांच्या हातावर आणि पाठीवर वार झाले. कोकाटे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा विरोध केल्यानंतर हल्लेखोर तेथून निघून गेले.

काही दिवसांपूर्वीच पाचपाखाडी येथील टेकडी बंगला भागातील एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी कोकाटे यांच्या मुलासह काही जणांविरोधात गुन्हा दाखल होता. याच वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, कोकाटे यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम २५,४ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (२), ३ (५), ३५२ (३), ४९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.