कल्याण – चित्रपटातील कथानकाप्रमाणे बदलापूरच्या एका सुस्थितीत कुटुंबातील ४४ वर्षाच्या व्यक्तिने आपल्या पत्नीला मोबाईलवर संपर्क करून सांगितले…‘मी आता घरी येणार नाही. मुलांना पाहून घे. मी आता आत्महत्या करत आहे.’ आणि पतीने तात्काळ मोबाईल बंद केला. पत्नी बरोबरच्या बोलण्यानंतर पतीने कल्याण पश्चिमतील गांधारी नदीवरील पुलाच्या कठड्यावर उभे राहून शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता नदीत उडी मारून आत्महत्या केली.
धनाजी रघुनाथ शिंदे (४४) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव आहे. ते बदलापूर पश्चिम येथील मेट्रो रेसिडेन्सी गृहसंकुल भागात पत्नी आणि कुटुंबीयांसह राहत होते. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खबर देणार किसन गोविंद शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून घेतली आहे.
पतीच्या या अचानकच्या धक्कादायक बोलण्याने भेदरलेल्या पत्नी जयश्री शिंदे यांनी ही माहिती आपले दीर धनाजी यांचे लहान भाऊ तानाजी यांना दिली. धनाजी शिंदे यांनी बोलत असताना कोठून फोन केला होता. त्यांचे ठिकाण तांत्रिक माहितीच्या आधारे शोधण्यात आले. हे ठिकाण पडघा पोलीस ठाणे हद्दीत आढळून आले. शिंदे कुटुंबीयांनी पडघा परिसरात, गांधारी नदी परिसरात शोध घेतला धनाजी आढळून आले नाहीत. तानाजी शिंदे यांनी याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात धनाजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
तानाजी शिंदे यांनी कल्याण पश्चिमेतील कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारे नदी पूल भागात जाऊन धनाजी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ते आढळले नाहीत. तानाजी यांनी गांधारे नदी परिसरात राहणाऱ्या मच्छिमारांकडे विचारणा केली. त्यावेळी शिंदे नावाच्या मच्छिमाराने सांगितले, की अंगात सफेद सदरा, काळी विजार आणि पायात काळे बूट असलेल्या एका व्यक्तिने शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान गांधारी पुलाच्या कठड्यावर उभे राहून काही क्षणात नदीत उडी मारली असल्याचे आपण पाहिले. त्या व्यक्तिने बचावासाठी कोणाला संधी दिली नाही. उडी मारलेली व्यक्ति ही धनाजी शिंदे असण्याची शक्यता असावी, याची शिंदे कुटुंबीयांना खात्री पटली.
पालिका अग्निशमन विभागाला ही माहिती देण्यात आली. दुर्गाडी किल्ला गणेश घाट येथून खबर देणारे किसन शिंदे यांनी बोटीच्या साहाय्याने धनाजी शिंदे यांचा पाण्यात ते कोठे तरंगताना दिसतात का म्हणून शोध सुरू केला. बोटीने पाण्यातून मार्गक्रमण करत असताना, किसन शिंदे यांना मासेमारी करणारा एक मच्छिमार दिसला. शिंदे यांनी त्यांच्याकडे पाण्यात कोठे पुरूष जातीचा मृतदेह दिसला की म्हणून विचारणा केली. त्यावेळी मच्छिमाराने गांधारी नदीकडून वाहत आलेला एक मृतदेह पुढील भागात खाडी किनाऱ्यावर तरंगत आहे असे सांगितले.
मच्छिमाराने दिलेल्या माहितीप्रमाणे शिंदे यांनी त्या दिशेने बोट वल्हवली त्यावेळी त्यांना एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आणि तो धनाजी शिंदे यांचा असल्याची खात्री पटली. दोन दिवस पाण्यात राहिल्यानेे ते मयत झाले होते.