ठाणे – भिवंडीतील कशेळी खाडीत एका ४३ वर्षीय व्यक्तीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी नारपोली पोलिस कर्मचारी, ठाणे अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.
अविनाश गोविंद उतेकर (४३) असे कशेळी खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ठाणे जिल्यातील वांगणी येथे राहतात. सोमवारी मध्यरात्री २.४९ वाजताच्या सुमारास उतेकर यांनी भिवंडीतील कशेळी खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी नारपोली पोलिस कर्मचारी, ठाणे अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.
नारपोली पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने उतेकर यांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत उतेकर यांच्या चेहऱ्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
मागील महिन्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. एका ५३ वर्षीय व्यक्तीने या खाडीत उडी घेतली होती. त्यांचा मृतदेह तिसऱ्या दिवशी काल्हेर येथे सापडला होता. ही घटना अद्याप ठाणेकरांच्या स्मरणात असतानाच सोमवारी उतेकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या सलग घडणाऱ्या घटनांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.