ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील हार्बर मार्गिकेची स्थानके व्यवसायिकांच्या आणि नोकरदार प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. नवी मुंबईत २५ वर्षांपूर्वी सिडकोने ही स्थानके उभारली होती. या स्थानकांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणांवरून सिडको आणि रेल्वे प्रशासनामध्ये वेगवेगळी मतांतरे होती. आता ही रेल्वे स्थानके मध्य रेल्वेकडे जाण्याची शक्यता असून भविष्यात या स्थानकांमध्ये आणखी काही सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई शहरात मोठ्याप्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा आणि मुलुंड, भांडूप, मुंबई उपनगरातील लाखो प्रवासी दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत जातात. तसेच नवी मुंबईतून मुंबई, ठाणे शहराच्या दिशेने देखील हजारो प्रवासी येतात. ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावरून दिवसाला १० लाखाहून अधिक प्रवासी वाहतुक करत असतात.
या स्थानकांची जबाबदारी जबाबदारी जशीच्या तशी घेण्यास सिडकोने रेल्वे प्रशासनाला कळविले. त्यामुळे या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करुन नव्याने बांधलेल्या स्वरुपात हस्तांतरित करण्याचे रेल्वे कडून सांगण्यात आले.
कोणत्या स्थानकांचा सामावेश
वाशी पनवेल हार्बर मार्गावरील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड, बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली, ऐरोली, रबाळे या स्थानकांचा सामावेश आहे.
हस्तांतर कधी होईल
सिडको आणि रेल्वे प्रशासनामध्ये चर्चा सुरु असून स्थानकांची आवश्यक देखभाल दुरुस्ती झाल्यानंतरच मध्य रेल्वे ती स्थानके नव्या स्वरुपात स्विकारेल.
मध्य रेल्वेकडे स्थानके गेल्यास काय होईल
सध्या विविध कारणांमुळे स्थानकांमध्ये देखभाल दुरुस्ती करणे काही प्रमाणात गरजेचे आहे. मध्य रेल्वेकडे ही स्थानके हस्तांतरित झाल्यास त्याची दुरुस्ती रेल्वेकडून होणार आहे.