लोकसता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील सावळाराम महाराज क्रीडासंकुल भागात होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. मतमोजणी केंद्राकडे येणारे सर्व रस्ते नागरिक आणि वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांची गर्दी विचारात घेऊन तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पर्यायी रस्ते मार्गावरून वाहतूक वळविण्यात आल्याने शहरात सकाळपासून वाहन कोंडी झाली आहे. कार्यकर्त्यांचे जथ्थे अंबरनाथ, मुंब्रा, कळवा, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, कल्याण भागातून सावळाराम महाराज क्रीडासंकुला बाहेर दाखल झाले आहेत. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजिव डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वैशाली दरेकर निवडणूक लढवित आहेत. अपक्ष उमेदवारांचे समर्थकही मतमोजणी केंद्राबाहेर दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात आहेत. तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते वैशाली दरेकर यांचा जयघोष करत आहेत. या घोषणाबाजीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सज्ज आहेत.

आणखी वाचा-महिन्यापासून शहापूर परिसरातून जीओचे नेटवर्क गायब, नागरिक त्रस्त

अनेक नागरिक उत्सुकतेपोटी मतदान केंद्रांबाहेर निकाल ऐकण्यासाठी दाखल झाले आहेत.मतमोजणी केंद्रातून कोणत्याही प्रकारची माहिती माध्यम कक्षात देण्यात येत नसल्याने त्यामुळे मतफेरीतील माहिती मिळविताना पत्रकारांना अडचणी येत आहेत. पहिल्या फेरीत श्रीकांत शिंदे यांना २२हजार ७५२ तर वैशाली दरेकर यांना १३ हजार २७८ मते पडली आहेत. पहिल्या फेरीत शिंदे नऊ हजार ४७४ मतांनी आघाडीवर आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत श्रीकांत शिंदे यांना तीन हजार ३५८, वैशाली दरेकर यांना दोन हजार ८९४ मते मिळाली आहेत. नोटाला १३० मतदान झाले आहे.