डोंबिवली : अरूंद रस्ते, वाढती वाहन संख्या, रस्त्याच्या दुतर्फा उभी करण्यात आलेली वाहने यामुळे कल्याण, डोंबिवली शहरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील एका रिक्षा चालकाने डोंबिवली वाहतूक विभाग कार्यालयासमोर रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या रिक्षा चालका विरूध्द एका पोलिसाच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश रामचंद्र गावकर (३०) असे गुन्हा दाखल रिक्षा चालकाचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव टावरीपाडा शारदा निवासमध्ये राहतात. गणेश गावकर यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात वाहनतळ सोडून झटपट प्रवासी मिळतील यासाठी अनेक रिक्षा चालक रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर, चौक, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर रिक्षा उभ्या करून प्रवासी मिळविण्याचा प्रयत्न करतात.
आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलीस आले की हे रिक्षा चालक पळून जातात. स्थानिक पोलिसांनी अशा बेशिस्त रिक्षा चालकांविरुध्द थेट गुन्हा दाखल करण्याची मोहीम उघडली आहे. रेल्वे स्थानक भागात पालिकेचे स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे असुनही आपण कॅमेऱ्यात कैद होत आहोत. त्याची माहिती वाहतूक विभाग, पोलिसांना कळते हे समजूनही अनेक रिक्षा चालक पोलीस, वाहतूक पोलिसांना जुमानण्यास तयार नाहीत. त्यामुळे अशा मुजोर रिक्षा चालकांविरुध्द पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
मंगळवारी दुपारी गणेश गावकर हे रिक्षा चालक प्रवासी वाहतुकीसाठी डोंबिवली पूर्व भागात आले होते. त्यांनी आपली रिक्षा रेल्वे स्थानक भागातील वाहनतळावर उभी करून मग प्रवासी घेणे आवश्यक होते. परंतु, गावकर यांनी डोंबिवली वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. आपल्यामळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे हे माहिती असुनही त्यांनी आपली रिक्षा बाजुला घेतली नाही. ही बाब रामनगर पोलिसांच्या गस्तीवरील पथकाला निदर्शनास आली. त्यांनी गणेश गावकर यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांनी नियमबाह्यपणे रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा आणला. आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून गणेश गावकर यांच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात हवालदार सुनील शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकारी धनंजय चव्हाण याप्रकरणाचा तपास करत आहेत.