कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कुठेही विकास दिसत नाही. या शहरांमधून विकास पूर्णपणे हरवलाय. विकास फक्त भाजपचे नगरसेवक विकास म्हात्रे यांचाच झाला आहे. याव्यतिरिक्त विकास कुठे झाला असेल तर मला तो दाखवा, अशी खरमरीत टीका महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी येथे माध्यमांसमोर केली.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्री आव्हाड नियमित कल्याण-डोंबिवलीत येऊ लागले आहेत. त्यांनी नेहमीच असे शहरात यावे, अशी वक्तव्ये करावीत, जेणेकरून त्यानिमित्ताने तरी शहरविकासाचे प्रश्न मार्गी लागतील, असा प्रतिटोला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंत्री आव्हाड यांना लगावला. भाजप नगरसेवक विकास म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. तो होऊ शकला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री आव्हाड शनिवारी कल्याणमध्ये आले होते. कर्नाटकातील हिजाब प्रश्नावर मंत्री आव्हाड म्हणाले, कुणी काय खावे, घालावे, कोणी कोणता पेहराव करावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. गणवेश अभिकल्प नावाचे एक नवीन केंद्रीय खाते तयार करा. म्हणजे असे जे काही प्रश्न निर्माण होतात ते कायमचे मिटतील, असे मंत्री आव्हाड यांनी सांगितले.
आगामी पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला आहे का, या प्रश्नावर मंत्री आव्हाड यांनी सांगितले, आम्ही आघाडीधर्म पाळतो. आघाडी करा हे आम्ही जाहीरपणे म्हणत असतो. त्यांच्या मनात काय आहे हे ओळखायला मी ज्योतिषी नाही. वेळ येईल त्याप्रमाणे निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
पालिका निवडणुकांसाठी आघाडीचा विचार -शिंदे
कल्याण: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. अलीकडे झालेल्या नगरपंचायती निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडी करण्यास काहीच हरकत नाही, असे विधान नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कल्याणजवळील मलंगगड भागात आयोजित क्रिकेट सामान्यांच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना केले. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी आघाडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.