ठाणे – दिवा रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. या स्थानकावरून मुंबई सह कोकण, पनवेल, वसई, कर्जत, कसारा दिशेने सतत रेल्वे सेवा सुरू असते. तब्बल आठ फलाट असलेल्या या मोठ्या स्थानकावर प्रवाशांसाठी फलाट क्रमांक एकवर फक्त एकच शौचालय होते. मात्र ते स्थानकातील पुलाच्या बांधकामामुळे पाडण्यात आले होते. आता ते नव्याने बांधण्यात आले आहे. मात्र ते ही अद्याप सुरू झाले नसल्याने प्रवाशांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य रेल्वे वरील दिवा स्थानक हे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. मात्र हेच दिवा स्थानक अनेकदा समस्यांच्या गर्तेत अडकलेले अनेकदा उघड झाले आहे. स्थानकावर अपुरे पादचारी पुल, अरुंद जिने, उदवाहकाचा अभाव तसेच फलाटांवरील लाद्या निखळने यांसारख्या अनेक समस्यांमुळे दिवा रेल्वे स्थानक कायम चर्चेत असते. तर सर्वात महत्वाचे असलेले या स्थानकात अधिक जलद लोकल गाड्यांना थांबा देण्याची मागणी गेली अनेक वर्ष स्थानिक प्रवासी आणि संघटना करत आहे. असे असतानाच पुन्हा एकदा स्थानकात शौचालय अभावामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दिवा रेल्वे स्थानकात एकूण ८ फलाट आहे. सुरुवातीला संपूर्ण स्थानकासाठी फलाट क्रमांक एकवर अवघे एक शौचालय होते. तर दरम्यानच्या काळात या ठिकाणी पुलाची उभारणी करण्यात आली आणि एकमेव शौचालय पाडण्यात आले. यानंतर प्रवाशांची मोठी गैरसोय पाहता खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत हा विषय मांडून तातडीने हे शौचालय नव्याने उभारण्याचे आदेश दिले.
यानंतर आता हे शौचालय तयार झाले आहे, मात्र सुरू करण्यात आले नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तर फलाट क्रमांक पाच आणि सहा येथे अधिक दोन शौचालयाची उभारणी करण्यात येत आहे. याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र याला देखील विलंब होत आहे. यामुळे प्रामुख्यानं महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दिवा स्थानकावर उभारण्यात येणाऱ्या नव्या शौचालय व स्नानगृहासाठी प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये. तसेच हे शौचालय तातडीने कार्यान्वित करून प्रवाशांसाठी खुले करण्यात यावे. – आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना.