डोंबिवली – आम्ही तुमच्या मुलाला ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीला लावतो. मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. यापूर्वी अशाप्रकारे अनेक मुलांना ऑस्ट्रेलियात नोकऱ्या लावल्या आहेत, असे सांगून एकाच कुटुंबातील तीन इसमांनी डोंबिवलीतील सारस्वत कॉलनी भागातील एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची २० लाख रूपयांची फसवणूक केली आहे.
सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सोमनाथ नारायण विसपुते (७४) यांनी या फसवणूक प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रारदार विसपुते यांच्या तक्रारीवरून इरफान इस्माईल पारकर, त्याची पत्नी, लियाकत इस्माईल पारकर यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहितेप्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सन २०१७ ते २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
पोलीस ठाण्यातील प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती, अशी की तक्रारदार सोमनाथ विसपुते आणि गुन्हा दाखल इसम हे परिचित होते. या ओळखीतून पारकर कुटुंबीय तक्रारदार विसपुते यांच्या घरी येऊन आम्ही ऑस्ट्रेलिया देशात अनेक मुलांना नोकरीस लावले आहे. आम्ही तुमचा मुलगा राहुल विसपुते यालाही ऑस्ट्रेलियामध्ये ह्युमन रिसर्च या कंपनीत नोकरीस लावतो, असे आश्वासन दिले. या कंपनीमध्ये रग्गड वेतन मिळते. असे सांगितले. विसपुते कुटुंबीयांचा पारकर कुटुंबीयांनी विश्वास संपादन केला. आम्ही तुमच्या मुलाचे पारपत्र काढून देतो, असेही सांगण्यात आले.
मुलाला विदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळते, असा विचार करून पारकर कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे मागील नऊ वर्षाच्या कालावधीत तक्रारदार विसपुते यांनी पारकर कुटुंबीयांना दिलेल्या बँक खात्यावर आणि रोख स्वरुपात एकूण २० लाख रूपये हस्तांतरित केले. वीस लाख रूपये देऊन झाल्यानंतर विसपुते यांनी इरफान पारकर आणि इतर दोन यांच्या पाठीमागे तगादा लावून मुलाचे पारपत्र, त्याला ऑस्ट्रेलियात केव्हा नोकरी मिळेल. कधी त्याला तेथे जावे लागेल. त्याचे नियुक्ती पत्र अशी विचारणा करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला पारकर कुटुंबीयांनी त्यांना वेळकाढूपणाची उत्तरे दिली. त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. नोकरी देणार नसाल तर पैसे परत करण्याची मागणी तक्रारदारने सुरू केली. त्यालाही प्रतिसाद मिळेनासा झाला.
पारकर कुटु्ंबायांनी आपणास पारपत्र, मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आपल्याकडून वीस लाख रूपये वसूल करून आपली आर्थिक फसवणूक केली म्हणून सोमनाथ विसपुते यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मागील काही दिवसांपासून डोंबिवलीतील तरूणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत.