डोंबिवली : डोंबिवलीत काही वर्षापूर्वी अंमली पदार्थांचे तस्कर गतिमंद, मतिमंद विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या दप्तरांचा वापर गांजा, चरस, मेफेड्रोन तस्करीसाठी करत होते. हा प्रकार पोलिसांनी मोठ्या कौशल्याने उघड करून तो कायमस्वरूपी बंद केला. आता डोंबिवलीतील नामवंत शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या हातात गांजा, ई-सिगारेट दिसून लागल्याने शिक्षण संस्था चालक हैराण झाले आहेत.

मागील सहा महिन्यापूर्वी आणि गेल्या काही दिवसापूर्वी एका नामवंत शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. शिक्षण संस्था चालकांना यासंदर्भातची माहिती शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून मिळाल्यावर संबंधित मुलांच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांना योग्य समज देऊन या सर्व गोष्टींपासून परावृत्त करण्यात आले. काही मुले मात्र शाळा संस्था चालक, शिक्षक यांनी वारंवार तंबी देऊनही गांजाचा शाळेतील वापर थांबवत नव्हते.

या विद्यार्थ्यांमुळे अन्य विद्यार्थी बिघडण्याची शक्यता होती. हा प्रकार पोलीस ठाण्यात जाऊन पोलिस तक्रारी, चौकशीचे प्रकार सुरू झाले तर या सर्व प्रकरणात शाळेची बदनामी होण्याची शक्यता होती. त्यामुळे संबंधित शिक्षण संस्थेने त्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली असल्याचे समजते.

डोंबिवली, कल्याण परिसरात यापूर्वी गांजा आणि इतर अंमली पदार्थांची तस्करी करणारे मुख्य तस्कर शहरातील गतिमंद, मतिमंद मुलांचे मार्ग हेरून ते कोठुन कोठे जातात हे तपासून त्या विद्यार्थ्यांच्या शालेय दप्तरात गांजाच्या पुड्या टाकून त्या इच्छित स्थळी पोहचतील अशी काळजी घेत होते. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अंमली पदार्थ तस्करांनी हा मार्ग अवलंबला होता. या विशेष मुलांशी संबंधित शिक्षक, पालक यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी पोलिसांशी संपर्क करून हा तस्करीचा मार्ग कायमचा बंद पाडला.

काही महिन्यापूर्वी डोंबिवलीतील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात गांजा असल्याची गुप्त माहिती शाळेतील शिक्षकांना समजली. ही माहिती संस्था चालक, मुख्याध्यापक यांना देण्यात आली. त्या मुलांच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांना याप्रकाराने आरोग्याची खराबी आणि पोलीस ससेमिरा लागला तर जीवनाची वाटचाल खडतर होईल असा इशारा दिला. तरीही हे विद्यार्थी चोरून लपून शाळेत गांजा आणत होते. हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना बिघडविण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास आल्यावर या तस्करीतील तीन विद्यार्थ्यांवर शाळेने कठोर कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील काही दिवसापूर्वी एका नामवंत शाळेतील विद्यार्थी शाळेच्या आवारात घोळक्याने भांडत होते. हे भांडण एका शिक्षिकेच्या निदर्शनास आले. हे भांडण ई सिगारेट ओढणे आणि त्या माध्यमातून मिळालेल्या पैशाच्या व्यवहारातून सुरू असल्याचे शिक्षिकेला समजले. शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षण संस्था चालकांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांच्या माध्यमातून पालक, शिक्षकांना योग्य समज देण्यात आली. या भांडणातील एका प्रमुख विद्यार्थ्याने आपले नाव पुढे येऊ नये म्हणून काही रक्कम इतर विद्यार्थ्यांना देण्याची तयारी दर्शवली होती, असे शाळेने केलेल्या चौकशीत पुढे आले. गांजा तस्कर तस्करीसाठी शालेय विद्यार्थी वापरत असल्याचे या प्रकारातून पुढे आले आहे.