डोंबिवली – विधिमंडळ अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना समाज कल्याण मंत्री, शिंदे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे बसवेश्वर समर्थक आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या भावना दुखविण्याचे काम मंत्री शिरसाट यांनी केल्याने शिवा संघटनेतर्फे डोंबिवलीत शुक्रवारी मंत्री शिरसाठ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.

मागील दोन महिन्यांपासून विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री संजय शिरसाट यांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अनादर करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या एका मंत्र्याने विधिमंडळात असे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस रूपेश होनराव यांनी केली आहे.

समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, असे आवाहन करूनही शिरसाट माफी मागण्यास तयार नाहीत. त्यामुळे शिरसाट यांच्या विरोधात राज्यभर उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला आहे. आतापर्यंत शिरसाट यांच्या प्रतिमांवर जोडे मारले जात आहेत. लवकरच त्यांचे पुतळे जाळण्याचे कार्यक्रम हाती घेतले जातील, असा इशारा सरचिटणीस होनराव यांनी दिला आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळा संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी प्रश्नाला उत्तर देताना बसवेश्वर महाराज यांचा समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी एकेरी उल्लेख केला. या वक्तव्यामुळे महात्मा बसवेश्वर महाराजांबद्दल अनादर व्यक्त करून मंत्री शिरसाठ यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. झालेली चूक मान्य न करता मंत्री शिरसाट यावर काही भाष्य करत नाहीत. त्यामुळे त्यांनी हेतुपुरस्सर अशी कृती केली आहे, अशा समाजाच्या भावना झाल्या आहेत, असे रुपेश होनराव यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवलीतील रेल्वे स्थानक भागातील आंदोलनात शिवा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय मुदगडे, डोंबिवली शहर अध्यक्ष दिगंबर गिराम, सिध्देश उन्हाळे, शिवा संघटनेचे सदस्य, बसवेश्वर समर्थक अधिक संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिमा असलेला फलक घेऊन त्याला पायातील वाहणा काढून मारल्या. आपला निषेध नोंदवला.