डोंबिवली – जिल्ह्याच्या विविध भागात चौथ्या आसनावर नियमबाह्य पध्दतीने प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक विभागांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. अशाच पध्दतीने डोंबिवलीत कारवाई सुरू आहे. या कारवाईचा निषेध म्हणून शनिवारी संध्याकाळी साडे सहा वाजता डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील इंदिरा चौक भागात काही मोजक्या रिक्षा चालकांनी अचानक वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने रिक्षा बंद आंदोलन केले. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे हाल झाले.
रिक्षा चालकांनी वाहतूक नियमाप्रमाणे तीन प्रवासी घेऊन प्रवास करणे आवश्यक आहे. अलीकडे डोंबिवली शहरासह बहुतांशी शहरांमध्ये रिक्षा चालक आपल्या आसनाशेजारी एक प्रवासी घेऊन चार प्रवाशांची वाहतूक एकावेळी करतो. चालका शेजारील चौथ्या आसनावरील प्रवासी वाहतूक नियमबाह्य असल्याने ठाणे जिल्ह्यात वरिष्ठांच्या आदेशावरून स्थानिक वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षा चालकांविरुध्द दंडात्मक कारवाईची मोहीम उघडली आहे.
या कारवाईने आपल्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा कांगावा करत डोंबिवली पूर्वेतील काही मोजक्या रिक्षा चालकांनी शनिवारी संध्याकाळी अचानक रिक्षा बंद आंदोलन केले. वर्दळीचा इंदिरा चौक वाहतुकीसाठी रिक्षा चालकांनी आंदोलनासाठी बंद केल्याने केळकर रस्ता, फडके रस्ता, मानपाडा रस्ता, बाजीप्रभू चौक, पाटकर रस्ता भागात अभूतपूर्व वाहन कोंडी झाली. संध्याकाळी कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना वाहनतळांवर रिक्षा मिळणे कठीण झाले. लोकलने धक्केबुक्के खात प्रवास करून आलेले प्रवासी रिक्षा मिळत नसल्याने संतप्त झाले.
वाहतूक पोलिसांच्या आवाक्याबाहेर परिस्थिती गेली. प्रवाशांनी आक्रमक होत रिक्षा चालकांच्या या मनमानी आणि मुजोरीबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींना दोष दिले. इतर शहरात रिक्षा चालकांची मनमानी नसताना नियमबाह्य कारवाई विरुध्द रिक्षा चालक आंदोलन करतात कसे. अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस, आरटीओने दंडात्मक आणि कठोर कारवाईची मागणी प्रवाशांनी केली. एक तास हा रिक्षा बंदचा गोंधळ डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात सुरू होता.
रिक्षेतून चौथा प्रवासी नेणे नियमबाह्य आहे. त्याविरुध्द वाहतूक पोलीस कारवाई करत असतील तर रिक्षा चालकांनी अचानक उठाव करणे बेशिस्तीचे आहे. शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रवाशांना अशा वेठीस धरणाऱ्या रिक्षा चालकांवर कठोर कारवाईसाठी आक्रमक झाले पाहिजे. केवळ मिरवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देत नाही. – रमेश सप्रे, प्रवासी.
पूर्व भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम सुरू आहे. वाहतुकीसाठी रस्ते मोकळे केले आहेत. चौथ्या आसनावरील नियमानुसार सुरू असलेली कारवाई सुरूच राहणार आहे. – श्रीराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, डोंबिवली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
वाहतुकीला शिस्त लावणे आणि नियमानुसार कारवाई करणे हे वाहतूक पोलिसांचे काम आहे. अचानक कारवाई करून वाहतुकीला शिस्त लागत नाही. आपल्या ठरलेल्या ठिकाणावर वाहतूक पोलिसांनी आपले कायदेशीर कर्तव्य पार पाडावे. – काळू कोमासकर, अध्यक्ष, लाल बावटा रिक्षा संघटना.