म्हारळ, कांबाजवळ रस्त्याची दुरवस्था; वाहनचालक, प्रवाशांचे हाल

उल्हासनगर : मुंबई-अहमदनगर महामार्गाची कल्याणजवळील म्हारळ ते कांबा या दरम्यान अक्षरश: चाळण झाली आहे. दूध, फळभाज्या यांच्यासह प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता वर्षांतून सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ खड्डेमय असतो. त्यामुळे वाहनचालक आणि रस्त्याच्या शेजारी राहणाऱ्या म्हारळ, वरप, कांबा यांसारख्या गावातील रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. येथे सध्या तासनतास कोंडी होत असून त्यामुळे सर्वच वाहतुकीला मोठा फटका बसत आहे.

कल्याण-अहमदनगर महामार्गावर गेल्या काही वर्षांत वर्दळ वाढली आहे. मात्र याच महामार्गाची गेल्या काही वर्षांपासून दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. या मार्गावर शहाड ते म्हारळपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. म्हारळ ते पुढे कांबापर्यंत दोन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
navi mumbai, palm beach road
नवी मुंबई: पामबीच मार्गावर वाहतूक संथगतीने
seven injured after machinery in trailer
मुंबई नाशिक महामार्गावर ट्रेलर मधील यंत्र वाहनांवर पडून सात जण जखमी
khair tree costing of rupees 50 lakhs
वसई: महामार्गावर छुप्या मार्गाने खैर तस्करी, भाताणे वनविभागाची कारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

गेल्या काही वर्षांत या भागातील लोकसंख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने वाहनांची संख्याही अधिक आहे. खड्डय़ांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून अवघ्या दोन किलोमीटरचा पल्ला पार करण्यासाठी अर्धा ते एक तासापर्यंतचा वेळ लागत आहे. या मार्गावर अवजड वाहतूकही मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्याचा फटका स्थानिक वाहतुकीला बसत आहे. उल्हासनगर आणि कल्याण या मोठय़ा बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी स्थानिकांना मोठा वेळ खर्ची घालावा लागतो.  खड्डय़ांमुळे अनेक वाहनांचे अपघात होत असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

खड्डे, धूळ आणि आंदोलन

दोन वर्षांपूर्वी येथील एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांनी या रस्त्यातील खड्डे आणि धुळीला कंटाळून मोठे आंदोलन उभारले होते. पावसाळय़ात या रस्त्यावर खड्डय़ांमध्ये पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडचण होते, तर पाऊस उघडल्यानंतर धुळीमुळे रस्त्यावरून जाणे जिकिरीचे बनते. त्याचा त्रास रस्त्याशेजारील घरे, दुकाने आणि वाहनचालकांना सहन करावा लागतो. या रस्त्यावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही, रस्त्यापासून पुरेसे सामायिक अंतर राखले गेलेले नाही. डागडुजी वेळेत होत नसल्याने रस्त्याची दुरवस्था सातत्याने होत आहे. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी होत आहे.

या महामार्गाची निविदा मंजूर झाली असून म्हारळ ते पाचवा मैल या साडेतीन किलोमीटपर्यंतच्या काँक्रीटीकरणाचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. ऑक्टोबरपासून हे काम सुरू होऊ शकेल. सध्या रस्त्यातील खड्डय़ांमध्ये खडी टाकण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे दुरुस्तीत अडचणी येत आहेत.

– संजय उत्तरवार, विभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग