डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांकडून फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही. तुमच्या कारवाईने फेरीवाले डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून हटत नसल्याने आता आम्ही फेरीवाल्यांचा समाचार घेतो, असा इशारा देत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद पाटील यांनी बुधवारी सकाळी नियोजित वेळेप्रमाणे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागाला भेट दिली. मनसेच्या आक्रमकपणामुळे सोमवारपासून पालिका अधिकाऱ्यांनी पूर्व भागातील रस्त्यांवर एकही फेरीवाला दिसणार नाही अशी व्यवस्था केली होती. त्यामुळे रस्त्यांवर फेरीवाल्यांचा शुकशुकाट होता. ‘एक दिवस रेल्वे स्थानक भागात येऊन फेरीवाले, रस्ते, पदपथांची पाहणी करणार नाही, आता नियमित या भागात येऊन रस्ते नागरिकांना चालण्यासाठी मोकळे आहेत की नाहीत याची प्रत्यक्ष तपासणी करणार आहे. फेरीवाल्यांवर कारवाई होत नसेल तर पुढचे परिणाम अधिकारी, पोलीस यांनी भोगावेत,’ असा इशारा आ. पाटील यांनी दिला.आ. पाटील रेल्वे स्थानक भागात येणार म्हणून फेरीवाल्यांनी सामान परिसरातील इमारती, सार्वजनिक शौचालये, रेल्वे जिन्यांच्या खाली लपवून ठेवले होते. बहुतांशी फेरीवाले आ. प्रमोद उर्फ राजू पाटील येताच त्यांच्या दौऱ्याची छायाचित्र आपल्या मोबाईल मधून टीपत होते. हेही वाचा >>>दुरुस्ती कामामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरून एक एप्रिलपासून वाहनांना बंदी; वाहतूक मार्गात बदल पालिकेच्या ग, फ प्रभागाकडून दररोज फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा त्रास नागरिकांना होत असल्याने आ. पाटील यांनी रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असा इशारा गेल्या आठवड्यात आयुक्तांना दिला होता.आ. पाटील यांनी रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, वाहतूक विभाग, उर्सेकरवाडी, मधुबन सिनेमा गल्ली, कामत मेडिकल पदपथ, इंदिरा चौक परिसराची पायी पाहणी केली. त्यांच्या सोबत मनसेचे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे, मनोज घरत, प्रकाश भोईर, हर्षद पाटील, सुदेश चुडनाईक, प्रतिभा पाटील उपस्थित होते. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन सांडभोर यावेळी उपस्थित होते. आता फेरीवाल्यांवर नियमित पाळत एक दिवस डोंबिवली रेल्वे स्थानक भागात येऊन गेलो म्हणजे विषय संपलेला नाही. आता नियमित रेल्वे स्थानक भागात येऊन या भागातील रिक्षा चालकांना वाहनतळ सुरू करुन देणे, रस्ते, पदपथ मोकळे राहतील यासाठी व्यापाऱ्यांना समजावणे ही कामे केली जातील. मी येणार म्हणून फेरीवाला गायब आहेत. यापुढेही ते या भागात दिसता कामा नयेत. त्याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आ. पाटील यांनी सांगितले.उपायुक्त स्वाती देशपांडे यांची भेट घेऊन आ. पाटील यांनी रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला बसणार नाही असे कायमस्वरुपी नियोजन करा, अशी मागणी केली. हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदा बांधकामांची उभारणी खा. शिंदेंना टोला कोल्हापूर मधील एक रस्ता खराब होता म्हणून तेथील अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करावयास लावणारे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी बदलापूर ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे स्थानके, परिसरातील रस्ते, पदपथ सुस्थितीत राहतील यासाठीही पुढाकार घ्यावा. तो मतदारसंघ नसताना तेथे काम करता मग येथे काय झाले, असा प्रश्न आमदारांनी केला. (डोंबिवली रेल्वे स्थानक भागाची पाहणी करताना आ. प्रमोद पाटील आणि पालिका अधिकारी.)