ठाणे : एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले असताना, शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली होती. परंतु याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांना विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे.
विशेष म्हणजे, शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना डिवचणारे बॅनर लागले आहेत. त्यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय ठरले. ‘महाराष्ट्रात फक्त, जय महाराष्ट्र’ असे या बॅनरवर म्हटले आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र आहे.
राज आणि उद्धव ठाकरे शनिवारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विजयी मेळाव्यासाठी विविध कार्यक्रम आखले जात होते. त्यातच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली. याविषयी एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी आता विरोधकांकडून त्यांच्याविरोधात टीका होऊ लागली आहे.
ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. लोकप्रतिनिधी, सर्वाधिक माजी नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्या पक्षात आहेत. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांना इतर पक्षांकडून आव्हान कमी आहे. असे असतानाच, ठाण्यातील चौका-चौकात शिंदे यांना डिवचणारे बॅनर लागले आहेत.
हे बॅनर ठाणे स्थित अजय जेया यांनी उभारले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र आहे. त्यावर जय गुजरातच्या घोषणेचा उल्लेख आहे. त्याखाली अजय जेया यांनी लिहीले आहे की, महाराष्ट्रात फक्त ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ चालतो. येथे दुसऱ्या कोणत्या घोषणांना जागा नाही. ‘माझं राज्य, माझा अभिमान’ असा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. हे बॅनर ठाण्यातील महत्त्वाच्या चौकांत लागले आहेत.