ठाणे : ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. डिसेंबर अखेर पर्यंत हे रुग्णालय सुरु होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, आरोग्य विभागाचे सचिव निपुन विनायक, विरेंद्र सिंह, वित्त विभागाच्या सचिव ए. शैला, आरोग्य विभागाच्या आयुक्त कादंबरी बलकवडे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आरोग्य संचालक, सहसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार उपस्थित होते.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय कोर्टनाका परिसरात होते. या रुग्णालयात हजारो रुग्ण दरोरोज उपचारासाठी येत होते. परंतु जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम जुने झाल्याने त्याच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरुपात ठाणे मनोरुग्णालयाजवळ सुरू आहे. असे असतानाही रुग्णालयात ठाणे, रायगड यासह विविध भागातून नागरिक उपचारासाठी येत आहेत. सध्या कोर्टनाका येथील रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरु आहे.

ठाणे जिल्हा रुग्णालय अद्ययावत होत असून त्यामध्ये ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे महिला रुग्णालय आणि २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय असे एकूण ९०० खाटांचे हे रुग्णालय तयार होत आहे. त्याचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरण, यंत्रसामुग्री बसविणे कामे सुरू आहेत. साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या ९०० खाटांच्या रुग्णालयासाठी सुमारे १०७८ नविन पदांची भरती करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करतानाच अद्ययावत यंत्रसामुग्री बसविण्यावर भर देण्यात यावा. मंत्रालयात या रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिव सोना यांना दिले. हे जिल्हा रुग्णालय ठाणे जिल्ह्यासोबतच रायगड, नवी मुंबई, पालघर याभागातील नागरिकांसाठी वरदान ठरेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.