शेतकऱ्यांना बाजारभाव मिळवून देणारे उत्पादन घेण्यास प्राधान्य!

या कार्यक्रमात जिल्ह्य़ातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मानदेखील करण्यात आला.

कृषिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमत्र्यांचे मत

ठाणे : जिल्ह्य़ातील शेतीतज्ज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देणारे उत्पादन कसे घेता येईल यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत नगरविकास तथा ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. कृषिदिनाचे औचित्य साधून कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन कृषिदिनामित्त करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात जिल्ह्य़ातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मानदेखील करण्यात आला.

जिल्ह्य़ातील कृषितज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे आणि भागवत यांनी कृषी क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांनी सुचवलेले पर्याय वापरून शेती करणे गरजेचे आहे, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच एसआरटी पद्धतीने भातशेती केल्याने शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसे वाचतील. त्यांना जास्त उत्पन्न मिळू शकेल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ठाणे जिल्ह्य़ात आधी भात आणि नाचणी ही दोनच पिके घेतली जात होती. मात्र, आता भेंडी, भोपळी मिरची, काकडी, हळद अशी अनेक पिके घेतली जात आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे आज यातील काही भाज्या परदेशात निर्यात होत असल्याचे त्यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे, स्थानिक हवामान पाहून त्यानुसार पिकांचे पॅटर्न ठरवले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. गडचिरोलीप्रमाणेच ठाणे जिल्ह्य़ातही स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फळ यांसारखे जास्त नफा देणारी पिके घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत रानभाज्या महोत्सवही आयोजित करण्यात आला होता.

कृषितज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांनीदेखील शेतकऱ्यांना नवीन पद्धतीने शेती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. एसआरटी ही भात लागवडीची पद्धत जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून येत्या काही वर्षांत ती या जिल्ह्य़ाचे अर्थकारण बदलून, शेतकऱ्यांना नवीन आत्मविश्वास देईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ठाणे जिल्हधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषिरत्न पुरस्कार विजेते उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Farmers should select products that give maximum market prices eknath shinde zws

ताज्या बातम्या