डोंबिवली – कसाऱ्याहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या अति जलद लोकलमधून उतरताना पाच महिला प्रवासी फलाटावर पडून किरकोळ जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात घडला. रेल्वे सुरक्षा बळाच्या महिला हवालदारांनी त्यांच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार केले.

कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणारी सकाळची अति जलद लोकलने मुंबईत कामानिमित्त जाण्यासाठी नोकरदारांची धावपळ असते. ही लोकल डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा याच रेल्वे स्थानकांवर थांबते. कसाऱ्याकडून येणारी ही लोकल टिटवाळा, कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत प्रवाशांनी भरलेली असते. डोंबिवली रेल्वे स्थानकातून काही प्रवाशी ही लोकल पकडतात. या लोकलमधून डोंंबिवली स्थानकात उतरताना गाडी थांबण्यापूर्वीच फलाटावर उडी मारावी लागते. अन्यथा चढणारे प्रवासी उतरू देत नाहीत, असे चित्र असते.

हेही वाचा – अंबरनाथ : शहरातला एकमेव बाह्यवळण रस्ता अंधारात, वाहन चालकांची गैरसोय, मद्यपी, प्रेमी युगलांना मोकळे रान

हेही वाचा – ठाण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहाड, टिटवाळा रेल्वे स्थानकात कसारा लोकलमध्ये चढून एकूण पाच तरुणी डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी उतरत होत्या. त्यांना लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांनी उतरू दिले नाही. त्यामुळे पाचही तरुणींनी चढणाऱ्या महिलांना ढकलून फलाटावर उतरण्याचा प्रयत्न केला. त्यांना चढणाऱ्या महिलांचे धक्के लागल्याने त्या फलाटावर पडल्या. या गडबडीत काही महिला प्रवासी या प्रवाशांच्या अंगावरून गेल्या. पाच महिला प्रवासी फलाटावर पडून जखमी झाल्याची माहिती मिळताच डोंबिवली रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा बळाचे मुख्य हवालदार डी. एन.सिंग, हवालदार कामिनी सोनकर, साहाय्यक स्थानक व्यवस्थापक एस. के. चौबे, सेविका साक्षी शेळके यांनी धाव घेतली. त्यांनी जखमी महिला प्रवाशांना स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात नेले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यांना सोडून देण्यात आले.