कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील संत सावळाराम महाराज क्रीडासंकुलाच्या पुनर्विकासातील पहिल्याच्या टप्प्याच्या विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाने एकूण सहा कोटीचा निधी मंजूर केला. संत सावळाराम महाराज संपूर्ण क्रीडासंकुल विकासासाठी एमआयडीसीने १८० कोटी १२ लाख ७८ हजार ५२३ रूपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. या निधीपैकी ३६ कोटी निधीतून खेळाडुंचे क्रीडाविषयक उपक्रम, वाहनतळ आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
डोंबिवली, कल्याण शहर परिसरात क्रीडा कौशल्य असलेले अनेक गुणवान विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक आहेत. त्यांच्यासाठी डोंंबिवली एमआयडीसीतील १९.५० एकरचे छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारितील संत सावळाराम महाराज क्रीडासंकुल हे खेळ, क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी एकमेव प्रशस्त मैदान आहे. या मैदानाची दुरवस्था झाल्याने कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे गेल्या वर्षापासून एमआयडीसीकडे संत सावळाराम महाराज क्रीडासंकुलाच्या पुनर्विकासासाठी ५० कोटीचा निधी देण्याची मागणी करत आहेत.
या मैदानाचा पुनर्विकास नियोजनाप्रमाणे एमआयडीसीने करावा आणि त्यानंतर हे मैदान देखभाल आणि दुरुस्तीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेकडे हस्तांतरित करावे, अशी त्यांनी मागणी केली होती. सावळाराम महाराज मैदानाची नियोजन प्राधिकरण एमआयडीसी असताना सतरा वर्षापूर्वी पालिकेने एमआयडीसीच्या बांधकाम परवानग्या न घेता या मैदानात व्यापारी संकुल उभे केले.
या व्यापारी संकुलावर एमआयडीसीने दंडात्मक आणि थकित व्याजासह कारवाई करून पालिकेला ३१ लाख ६७ हजार भरण्याचे आदेशित केले होते. शासनस्तरावरील तडजोडीने १२ लाख ५४ लाख पालिकेन एमआयडीसीकडे भरणा केले. पालिकेचा मैदानातील क्रीडांगणावर ताबा आहे. क्रीडांगण विकासाचा प्रस्ताव पालिकेने एमआयडीसीला सादर केला तर त्यास त्यास एमआयडीसी मंजुरी देईल. या कामासाठी ५० कोटीचा निधी उपलब्ध करून देईल, असा प्रस्ताव संचालक मंडळाने मंजूर केला. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी क्रीडांगण विकासाचा हा विषय असल्याने तो लवकर मंजूर करावा अशी गळ एमआयडीसाला घातली.
सावळाराम महाराज क्रीडासंकुलाचा खासदार डाॅ. शिंदे यांच्या संकल्पनेतून विकास करायचा आणि यासंदर्भातचा ज्येष्ठ वास्तुशिल्पकार शशी प्रभू आणि असोसिएट यांंचा पालिकेच्या मागणीप्रमाणे विकसित करावयाचा ३६ कोटीचा आराखडा तयार असल्याचे एमआयडीसीला पालिकेने कळविले. हा निधी महामंडळाने पालिकेला उपलब्ध करून दिला.
अत्याधुनिक दर्जाचे क्रीडासंकुल विकसित करण्यासाठी एमआयडीसीने स्वतंत्रपणे पुणे येथील मे. फोर्थ डायमेंशन आर्किटेक्ट कंपनीतर्फे आराखडा सादर करून क्रीडांगणाच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी सहा कोटीचा प्रस्ताव सादर केला. या निधीला महामंडळ संचालक मंडळाने तत्वत मंजुरी दिली. एमआयडीसी क्रीडासंकुलाचा विकास करणार असल्याने पालिकेने आपल्या कडील जमा ३६ कोटीचा निधी एमआयडीसीला परत केला आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणूक काळापासून खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे सावळाराम महाराज क्रीडासंकुल विकासाचे आश्वासन नागरिकांना देत होते. त्याप्रमाणे त्यांनी निधी उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या अत्याधुनिकीकरणामुळे सावळाराम महाराज क्रीडासंकुलाचा येत्या दोन वर्षात चेहरामोहरा बदलणार आहे. जुलैपासून या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.