ठाणे : वन मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांच्या माध्यमातून ठाणे, पालघर जिल्ह्यात जनता दरबार भरविले जात आहेत. जनतेच्या दरबारात नेहमी नागरिक त्यांच्या कैफियत मांडण्यासाठी येत असतात. परंतु नुकत्याच झालेला त्यांचा जनता दरबार वेगळ्याच कारणासाठी चर्चेला आला. अशातच नवी मुंबईत झालेल्या जनता दरबारात नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण उपायुक्त गणेश नाईक यांच्यासमोर ढसा-ढसा रडताना दिसत आहेत. याचे चित्रीकरण सध्या प्रसारित होत असून चर्चा रंगू लागल्या आहेत.

वन मंत्री गणेश नाईक हे मागील काही महिन्यांपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेत आहेत. या जनता दरबाराला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असतो. परंतु नुकत्याच झालेल्या एका जनता दरबारामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण उपायुक्त या वन मंत्री गणेश नाईक यांच्यासमोर रडताना दिसत आहेत.

संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे नवी मुंबईतील नेते गजानन काळे यांनी टीका केली आहे. सर्वसामान्य व्यक्ती जनता दरबारामध्ये लोकांना रडू कोसळत असेल तर मी समजू शकतो. परंतु कंत्राटदाराची देयके (बिले) मिळावित म्हणून कोणीतरी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका कंत्राटदाराला जनता दरबारात घेऊन गेल्या होत्या. त्याचवेळी तेथे शिक्षण उपायुक्त खिल्लारी यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. महापालिका अधिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर प्रचंड आश्चर्यकारक असल्याचे काळे म्हणाले.

एका मुलाचा सहली दरम्यान मृत्यू झाला आहे. त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. ही चौकशी पूर्ण झाल्याने बिलाचा तगादा कंत्राटदार लावत आहे. तो मुद्दा घेऊन गणेश नाईक यांच्याकडे त्यांचे नगरसेवक येत आहेत आणि शिक्षण उपायुक्त रडत आहेत, हे चित्र नवी मुंबई आणि येथील नागिरकांसाठी शोभनीय नाही असे ते म्हणाले.