ठाण्याच्या सांस्कृतिक विश्वाचे एक प्रमुख केंद्र असलेल्या सहयोग मंदिराचा श्वास सध्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत पार्किंग तसेच कचऱ्यामुळे कोंडला आहे. सहयोग मंदिर सभागृहामध्ये वर्षभर सातत्याने सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र सध्या येथे कचऱ्याचे साम्राज्य आहे. तसेच आधीच अरुंद असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करून ठेवल्याने नागरिकांची कोंडी होत आहे.
सेवा निवृत्त संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदींचे कार्यालय असल्यामुळे येथे सतत वर्दळ असते. त्याचबरोबर या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे घाणेकर उद्यान आहे. तिथे मुले संध्याकाळी खेळायला येतात. उद्यानाच्या संरक्षक जाळीवर सुमारे वर्षभरापूर्वी होऊन गेलेल्या कार्यक्रमांच्या जाहिराती आजही झळकत आहेत. त्यामुळे उद्यान विद्रुप झाले आहे. शेजारील घंटाळी तसेच राममारुती मार्गाकडे जाण्यासाठी मध्य मार्ग म्हणून या पथाचा वापर होतो. या पथाच्या दोन्ही बाजूस वीज तसेच दूरध्वनीचे डीपी आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडली आहे.
येथील एका खांबावरील फलकावर ‘येथे कचरा टाकू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल’, अशी सूचना लिहिलेली आहे. मात्र त्या फलकाखालीच कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत.
या पथावर ठिकठिकाणी केबल दुरुस्ती, पाण्याची लाइन यासाठी उखडलेले पेव्हर ब्लॉक्स तसेच सोडून देण्यात आलेले आहेत. गटारांवरची झाकणे बऱ्याचदा तुटलेली असतात. कडेकडेने चालण्याची सोय नाही. या पथावर आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दल कसे पोहोचणार?
– महेंद्र मोने, जागरूक नागरिक